
पुणे : पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता अखेर मिटला आहे . काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या मिरवणुकिंना वेळ लागतो ज्यामुळे आम्हाला ३६ तास रांगेत थांबावं लागतं म्हणून आम्ही मानाच्या गणपतीं आधी मिरवणूक काढणार असा निर्णय घेतला होता . ज्यामुळे या मंडळांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता . मात्र आता यावर तोडगा निघाला आहे . मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी लवकर निघणार असल्याची माहिती मिळाली आहे .
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पाच मानांच्या गणपती मंडळांचा आणि शहरातील इतर मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत वाद आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. त्या अनुषंगाने मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत हि बैठक सुरू होती . मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा हा वाद सुरू होता . या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतल्या. मात्र त्यांना यात अपयश आले . परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद सोडवण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार रासने यांच्यावर जबाबदारी दिली . त्यामुळे आज खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहे.
गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे . यासाठी सगळीकडे सार्वजनिक मंडळांची जोरदार तयारी सुरु आहे . गेल्या वर्षी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणूक रात्री सुरु होत असल्याने मंडळाने विसर्जन मिरवणूकीला वेळेत होण्यासाठी मिरवणूक रात्री उशिरा काढण्याऐवजी दुपारी ४ लाकाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला . पण या वर्षी मात्र एका नवीनच वादाला तोंड फुटले , पुण्यातील काही मंडळांनी मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत लागणाऱ्या वेळेवबर आक्षेप घेतला . यावर आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्व गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला असून मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी ९.३० वाजता सहभागी होतील; असा निर्णय झाल्यानंतर सगळ्याच गणेश मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेच्या बाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत मोहोळ म्हणाले, मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता मिरवणूक सुरू करतील. विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या कमी केली जाईल. तसेच सगळ्या मिरवणुकीत स्थिर वादन कोणी करणार नाही. पुण्यातील मिरवणूक वेळेत संपवायला हवी ही सगळ्या गणेश मंडळांची भूमिका होती. त्यानुसार मिरवणूक कमी वेळेत संपन्न होईल.
मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, कि या मंडळांमध्ये कुठलेही मतभेद नव्हते. पण संवाद होणे अपेक्षित होतं आणि आज तो झाला. मिरवणुकीच्या निमित्ताने दोन मतं नाही सर्वांचे एकच मत आहे. वाद नव्हतेच, दोन विचार वेगळे होते. भाजपचे आमदार आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे मुख्य पदाधिकारी हेमंत रासने म्हणाले, मानाचे गणपती हे व्यवस्थेचा भाग आहेत, सगळेच मानाचे गणपती आहेत. विसर्जन मिरवणूक सकाळी ९.३० वाजता सुरू करण्याच्या मागणीला सगळ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला . विद्युतरोषणाई नसलेल्या मंडळाची मिरवणूक सकाळी १२ ते ७ आणि विद्युतरोषणाई असलेल्या मंडळाची मिरवणूक ७ नंतर सुरु होईल. दगडूशेठ गणपती ४ वाजता विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल आणि एक ढोल ताशा पथक असेल.