Friday, August 22, 2025

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी

संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात ३२ दिवसांत २१ बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १२ आणि राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली.

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत २८ आणि २९ जुलै रोजी तर राज्यसभेत २९ आणि ३० जुलै रोजी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा झाली. लोकसभेत १८ तास ४१ मिनिटे तर राज्यसभेत १६ तास २५ मिनिटे 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत ७३ सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये ६५ सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिले.

लोकसभेत १८ ऑगस्ट रोजी विकसित भारत २०४७ साठी अंतराळ कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधकांनी सतत गोंधळ घातल्यामुळे ही चर्चा अपूर्णच राहिली. विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालण्यावर जास्त भर दिला. यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लोकसभेत ३१ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा