कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत
मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविक सज्ज होतात. पण, बाप्पा कोकणात येण्याआधीच त्यांच्या मूर्तींचा प्रवास सुरू होतो. कोकणात हजारो गणेशमूर्ती मुंबई, ठाणे आणि पुणे अशा ठिकाणांहून पोहोचवल्या जातात. मात्र, या वर्षी गणेशमूर्तींचा हा प्रवास खूपच कष्टदायक ठरत आहे. कारण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाली आहे.
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहनाने मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रत्येक काही मीटरवर खड्डे असल्याने गाड्या रस्त्यामधील खड्ड्यात आदळत पुढे सरकत आहेत. यामुळे वाहन चालकांसोबतच मूर्ती सुरक्षित पोहोचतील का याची चिंता मूर्ती घडवणारे कारागीर आणि भाविकांना सतावत आहे.
एका तासाच्या प्रवासाला पाच-सहा तास- ज्या अंतरासाठी साधारणपणे एक तास लागतो, तिथे आता तब्बल पाच ते सहा तास लागत आहेत. पेट्रोल-डिझेलचा खर्च वाढत असताना वेळदेखील जात आहे. त्यातच मूर्तींना तडा जाण्याचा किंवा नुकसान होण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. काही वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर तरी रस्ता नीट करावा, अशी मागणीही सातत्याने केली जात आहे. महामार्गाचे काम रखडलेले- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चार-लेनिंगचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही हा रस्ता अनेक ठिकाणी अपूर्णच आहे. कामाच्या ठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते, पावसामुळे झालेली खड्ड्यांची वाढ आणि नियोजनाचा अभाव या सगळ्याचा फटका आता कोकणकरांना आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांना बसत आहे. वर्षानुवर्षे ‘येतो, करतो’ या आश्वासनात महामार्गाचं काम रखडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महामार्गाचे काम १४ वर्षांपासून रखडले
भक्तांमध्ये नाराजी, सुरक्षिततेची चिंता- दरवर्षी लाखो गणेशभक्त कोकणात येऊन गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. पण सध्याच्या रस्त्याच्या अवस्थेमुळे प्रवासाचा आनंद नष्ट होऊन त्याची जागा भीती आणि त्रास घेत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गणेशभक्त आता एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत की, कोकणचा राजा म्हणजेच गणपती बाप्पा खड्डेमय महामार्गावरून सुखरूपपणे पोहोचावा.
प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आजवर हजारो कोकणवासीयांचा जीव गेल्याने असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या महामार्गाचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडले आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आलेले असल्याने रस्त्याची विदारक अवस्था वाहतुकीला धोकादायक ठरत आहे.