Friday, August 22, 2025

संसदेत घुसखोरीचा प्रयत्न, भिंत ओलांडून गरुडद्वारापर्यंत पोहोचलेल्याला अटक

संसदेत घुसखोरीचा प्रयत्न, भिंत ओलांडून गरुडद्वारापर्यंत पोहोचलेल्याला अटक

नवी दिल्ली : नव्या संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला. एक व्यक्ती भिंत ओलाडून गरुडद्वारापर्यंत पोहोचली. अखेर सुरक्षा रक्षकांनी घुसखोराला अटक केली.

संसदेच्या संरक्षणाची जबाबदारी आता सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. अती महत्त्वाची इमारत असल्यामुळे संसदेच्या प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा यंत्रणेची बारीक नजर असणे अपेक्षित असते. यासाठी नव्या संसदेच्या आवारात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यांनी अज्ञात व्यक्तीच्या हालचालींची नोंद घेतल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई केली. गरुडद्वार परिसरातून संसदेच्या आवारात घुसखोरीचा प्रयत्न करताना बघून अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली.

याआधी १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता. या घटनेत दिल्ली पोलिसांचे सहा कर्मचारी, संसदेच्या सुरक्षा यंत्रणेचे दोन कर्मचारी आणि संसद परिसरातल्या उद्यानाचा एक माळी अशा नऊ जणांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा पथकाने हल्ला करणाऱ्या पाच अतिरेक्यांना ठार केले होते. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पण संसदेची दोन्ही सभागृह नव्या इमारतीत स्थलांतरित केल्यानंतर संसदेच्या आवारात कायदा हाती घेण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. याआधी २०२३ मध्ये कृषी कायद्यांना विरोध म्हणून संसदेत प्रेक्षक म्हणून आलेल्या चौघांनी रंगीत धूर सोडून निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी संसदेत धूर करणाऱ्या चौघांना सुरक्षा पथकाने अटक केली होती. या घटनेनंतर थेट आता २०२५ मध्ये संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. यामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्था हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यावेळी संसदेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव रामा असे आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या रामाची कसून चौकशी सुरू आहे. प्रथमदर्शनी रामाचे वर्तन विक्षिप्त असल्याचे मत दिल्ली पोलिसांच्या जवानांनी व्यक्त केले आहे. यामुळे रामाला काही मानसिक त्रास आहे का याचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामाला शुक्रवारी पहाटे ५.५० च्या सुमारास घुसखोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment