‘तिथे पूजा जन्मते’

ऋतुराज : ऋतुजा केळकर


‘पूजा’ एक शब्द, एक श्वास... शब्दांशिवाय चालणाऱ्या पूजेस, विखुरलेल्या मनाला देवाचा मूक स्वीकार मिळणं आणि जीवनातील प्रत्येक शुद्ध कृतीत देवत्वाचं दर्शन घडणं म्हणजे ‘पूजा’. अंधाऱ्या भिंतीवर वातींचा फडफडणारा प्रकाश उगवतो शांततेच्या गाभाऱ्यात ती असते पूजा. अशा पूजेसाठी ठरावीक वेळ नसते. स्थळ तर मुळीच ठरलेले नसते. ती चालते मनाच्या एका कोपऱ्यात. जिथं आठवणींचं सोनं वितळतं. कधी एखादं फूल चुकून देवासमोर पडतं आणि त्या चुकण्यातच सगळं बरोबर घडतं. हात जोडले जातात पण मन मात्र विखुरलेलं असतं आणि तरी सुद्धा देव मात्र कधीच तक्रार करत नाही. पूजा म्हणजे निमित्त, आत्मा थोडा वेळ स्वतःस भेटायला निघतो. आतल्या शांततेत एक स्वर हेलावतो मग तोच उपचार असतो. निसंग झालेलं मन एक क्षणासाठी संगती अनुभवतं, तोच आशीर्वाद बनून सोबत वावरतो.


बरेचदा आपण देवळात जात नाही पण तरीही मानसिक पूजा ही चालूच असते. मनातल्या एका धुसर ओसरीवर, शब्दांशिवाय, मंत्रांशिवाय, फक्त श्वास आणि शुद्धता यांची लहरी वाहतच असतात. पूजा ही देवाच्या सान्निध्याची वाट नाही तर तो एक शांत संयमित क्षण असतो, ज्यात आपण स्वतःचं अस्तित्व हळुवारपणे आकाशात विलीन करतो. त्यातील ती हात जोडण्याची क्रिया नसून आपल्यातील आत्म्याचे असणं विसरण्याची साक्षरता आहे आणि जिथं ‘मी’ संपत जातो तिथे तनामनात देवत्व प्रकट होतं


अशा या देवाला त्याला नैवेद्य कसा दाखवायचा... तर आपलं मन फक्त अर्पण करणं हीच खरी पूजा आहे. यात कधी एखादं अस्फुट अश्रू ओघळतो आणि क्षणभर सगळं थांबतं… तीच पूजा होते.


देवाची पूजा फक्त देवासमोर नव्हे तर ती घडते जेव्हा आपण कर्म शुद्धतेने करतो. मला असं वाटतं की, पूजेसाठी मंदिर गरजेचं नाही तर आवश्यक आहे ती भावनेची स्वत:ला त्या जगत्जेत्याच्या चरणी अर्पण करण्याची. विद्यार्थी अभ्यास करताना किंवा आई बाळाला झोपवताना प्रत्येक कृतीत एक ‘पूजा’ आहे अशी पूजा की जी नि:स्वार्थीपणाने आणि समर्पणाने केली असेल.


अर्थात आपल्या कर्माला पूजेसारखा भाव देणं म्हणजेच आपले मोक्षाचे द्वार उघडणं होय. कारण जो कार्याला आराधनेचं रूप देतो, तो देवाची सेवा करतो. म्हणूनच कर्म हेच यज्ञ असते की ज्यात मनीचा भाव हा नैवेद्य बनतो. अशा जीवनधारणेत केलेली भक्ती हे केवळ विधी नसते तर ती एक जीवनशैली बनते. जेव्हा आपल्या कृतींतून अहंकार गळतो तेव्हा कर्म हेच निवृत्तीचा मार्ग बनतो. कर्माच्या पूजेतून जे जीवन घडते ते मोक्षाच्या वाटेकडे नेते. म्हणूनच जिथं प्रयत्नातच मुक्तता आहे आणि उपस्थितीतच अनंतता.


याच भावनेला कर्मयोग म्हणतात आणि जेव्हा प्रत्येक कृतीत भाव, समर्पण आणि विवेक असतो, तेव्हा ती कृती स्वत:च पूजेसमान होते. देव हे केवळ मंदिरात नाहीत तर ते आहेत त्या प्रत्येक कृतीत कारण जिथं मन शुद्ध आहे आणि कर्म नैसर्गिक श्रद्धेने केले जातं. म्हणूनच जरी गृहस्थाश्रमात अनेक गोष्टींची ओझी असली तरी अशा जीवनात कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचा समन्वय साधला जाऊ शकतो. जेव्हा एक गृहस्थ स्वतःच्या जीवनाच्या गाभ्याला आध्यात्मिकतेचा स्पर्श देतो, तेव्हा घर हेच मंदिर होतं आणि जीवनच आरती.


अखेरीस माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
“जिथे मन अर्पणाच्या सागरात विहरतं,
तिथे पूजा जन्मते।
स्वार्थहीन कर्म यज्ञ बनून,
भक्तीची ज्वाला प्रज्वलीते।
घर म्हणजे देवालय, अंतःकरण आरतीचे सूर गाते।
श्वासांमध्ये शांत देव लहरतो, श्रद्धेची किरणें मुक्तीचा मार्ग दर्शवते।”

Comments
Add Comment

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  परमेश्वर हा विषय समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही, हा जीवनविद्येचा

तणावात जगण्यापेक्षा हसत जगा

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य हल्ली बहुतेक सगळ्यांनाच ताणतणाव असतात. असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याला

भगवान परशुराम

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी  ऋषिश्रेष्ठ परशुरामांना खरी अंतरिक ओढ निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे

माँ नर्मदा... एक अाध्यात्मिक परिक्रमा!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे भारत हा प्राचीन संस्कृतीचा देश आहे. येथे असंख्य देवी-देवता, झाडे, वनस्पती, प्राणी आणि