सद्गुरू वामनराव पै
हिंदू संस्कृतीने देव सर्वत्र भरला आहे ही संकल्पना मांडलेली असली तरी प्रत्यक्षात त्याचा नेमका अर्थ काय हे नीट समजून घ्यायला हवे. सर्वांमध्ये देव भरलेला आहे म्हणजेच देवांत आपण भरलेले आहोत. मी एक उदाहरण देतो. विहिरीतून पाणी भरताना बुडलेल्या कळशीत पाणी आहे की पाण्यात कळशी आहे, या प्रश्नाचे काय उत्तर देता येईल? कळशीत पाणी आले कुठून? पाण्यात कळशी आहे म्हणून कळशीत पाणी आले, तसेच तुम्ही आम्ही सर्व त्या जगदीशाच्या अंगाखांद्यावर खेळतो, उठतो, बसतो, पण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत. तो आतमध्ये आनंदरूपाने, जाणीवरूपाने व शक्तिरूपाने आहे. हे सर्व आपल्याला अनुभवाला येते का?
शक्ती आपल्या अनुभवाला येते. आनंदासाठी आपण धडपड करतो. आनंद आपण शोधात असतो. मुळात या आनंदाला शोधायचेच कशाला? तू आनंदातच वास्तव्य करून आहेस आणि तू आनंद शोधायला लागलास तर तो तुला कसा सापडेल? जगात दुःखाचे कारण हेच का? जे आपल्यातच आहे ते आपण बाहेर शोधू लागलो तर ते आपल्याला कसे मिळणार? माणसांना हे समजत नाही आणि सांगितले तर पटतही नाही. आज सगळे सुखासाठी, आनंदासाठी धडपडत आहेत. सर्वांना भरपूर पैसे हवे आहेत. कारण त्याने कदाचित सुख, आनंद मिळेल असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र खरे तर पैशाने सुख मिळाले असते तर सगळे पैसेवाले, श्रीमंत सुखी झाले असते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बहुतांशी याउलट असते. जेवढे पैसे अधिक तेवढी भीती अधिक. पैसे जेवढे जास्त तेवढीच अधिक व्यवस्था तो पैसा सांभाळण्यासाठी करायला लागते. चोरांची, दरोडेखोरांची भीती. ही सततची भीती त्याला सोडत नाही. या भीतीमुळे त्याला झोपही नाही. ज्यांच्याकडे पैसे कमी ते लोक अधिक सुखाने झोपतात. सुख सोयी मिळविण्यासाठी पैसे हे हवेच पण त्याची मर्यादा ओळखलेली बरी. ही मर्यादा कळते शहाणपणातूनच. म्हणून जीवनविद्या सांगते की, शहाणपणाला पर्याय नाही. शहाणपण हे ज्ञानातून निर्माण होते. म्हणूनच ज्ञान हेच सुखाला व अज्ञान हे दुःखाला कारणीभूत ठरते.
गम्मत अशी आहे की, परमेश्वराचा विसर जेव्हा एखाद्याच्या ठायी होतो तेव्हाच त्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. विसर हा शब्द चुकीचा आहे, कारण विसर पडला आहे असे म्हणण्यासाठी आधी आठव, स्मरण असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ २९ चा पाढा, पावकी, निमकी हे सर्व लहानपणी पाठ केलेले, आता काही जण तो म्हणून दाखवतील मात्र बऱ्याच जणांना ते आठवणार नाही, नीट म्हणता येणार नाही.
सांगायचं मुद्दा ते आधी स्मरणात होते मात्र आत्ता विसरले. स्मरणात होते ते विस्मरणात जाते. मात्र ज्या परमेश्वराबद्दल योग्य माहितीच नाही, परमेश्वर स्मरणातच नाही तर तो विस्मरणात जाईलच कसा? म्हणूनच आज जे काही परमेश्वराच्या भक्तीच्या नावाखाली चालू आहे, त्यात बहुतांशी कर्मकांडच असते. केवळ कर्मकांड. त्यात देवही नसतो व धर्म ही नसतो.