भारतीय ऋषी - वसिष्ठ

  22

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी

आपल्या हजारो सैनिकांच्या खाण्यापिण्याची, आरामाची इतकी तत्पर व्यवस्था करणे, रानात आश्रमात राहणाऱ्या वसिष्ठांना कसे शक्य झाले म्हणून विश्वामित्रांनी विचारले असता वसिष्ठांनी आपल्याजवळ असलेल्या कामधेनूच्या साह्यामुळे झाले, असे सांगितले. तेव्हा विश्वामित्रांनी त्या कामधेनूचीच मागणी वसिष्ठांजवळ केली, पण ती देण्यास वसिष्ठांनी नकार दिल्याने क्रोधित झालेल्या विश्वामित्रांनी वसिष्ठांवरच हल्ला केला. या हल्ल्याला कामधेनूतून निघालेल्या सैनिकांनी परतवून लावले. अपमानित झालेल्या विश्वामित्रांनी आकसाने व कपटाने वसिष्ठांच्या शतपुत्रांचा वध केला. वसिष्ठांचे शतपुत्र जरी मारले गेले तरी विश्वरथांचा एक पुत्रही मारण्याचे वसिष्ठांच्या मनात आले नव्हते. वसिष्ठांचा ज्येष्ठ पुत्र शक्ती मारला गेला तेव्हा त्याची पत्नी अद्रुश्यन्ती ही गर्भवती होती. तिचा पुत्र महर्षी पराशर आणि पराशरांचे पुत्र महर्षी व्यास होत. विश्वामित्रांनी हिमालयात कठोर तपस्या करून महादेवांकडून संपूर्ण धनुर्विद्या प्राप्त केली. त्यानंतर परत वसिष्ठांच्या आश्रमाजवळ येऊन अग्निबाण सोडला. सर्व आश्रमवासी घाबरले पण वसिष्ठांनीही आपले धनुष्य घेऊन गर्जना केली की माझ्यावर वार कर, मी दाखवून देतो, क्षात्रबलाहून ब्रह्मबल श्रेष्ठ आहे आणि मग विश्वामित्रांच्या सर्व अस्त्रांना वसिष्ठांनी निष्प्रभ केले. तेव्हा पराजित झालेले विश्वामित्र वसिष्ठांना मारावयास आले होते. त्यावेळी वसिष्ठ-अरुंधतींचा संवाद ऐकून त्यांच्या मनातील वसिष्ठांबद्दलचे वैमनस्क्य विरून गेले.

ब्रह्मर्षी वसिष्ठ यांची गणना स्वायंभुव तसेच वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षीमध्ये होते. हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत. स्वायंभूव मन्वंतरात ते ब्रह्मदेवाच्या प्राणवायूतून उत्पन्न झाले तर वैवस्वत मन्वंतरात ते अग्नीच्या माध्यमातून निर्माण झाले. यांना मित्रा वरुण ऋषी व उर्वशीचे पुत्रही मानतात. उर्वशीला पाहून मित्रा वरुणाचे वीर्यस्खलन झाले. ते उर्वशीने एका कुंभात ठेवले. त्यातून वसिष्ठ व अगस्त्य यांचा जन्म झाला. ब्रह्मर्षी वसिष्ठ हे आर्यांच्या ओजस्वी संस्कृतीच्या सृष्टांमधले एक श्रेष्ठ सृष्टे होत. वसिष्ठचा अर्थच श्रेष्ठत्वाचा सूचक आहे. वसिष्ठांची पत्नी अरुंधती. त्यांना शतपुत्र होते.मृत्युंजय मंत्राचे द्रष्टे महर्षी वसिष्ठ हेच होत. त्यांची खालील ऋचेत दीर्घायुष्य मिळावे पण ते ओजस्वी असावे, अशी मनीषा प्रकट केली आहे,

तत् चक्षुः देवहितं पुरस्तात् शुक्रं उत् चरत् । पश्येम शरदः शतम् जीवेम शरदः शतम् ।। ऋ.मं.७ सू ६६.१६ अर्थ – देवांचा हितकारक म्हणजेच जे सर्वकल्याणाचे कार्य असते, त्याला साह्य करणारा, विश्वाचा नेत्र असा तेजस्वी (शुक्र) सूर्य आमच्या समोर उदयाला येऊन वर वर चढू लागला आहे, त्याचे हे तेजस्वी रूप आम्ही शंभर वर्षांपर्यंत पाहत राहावे, आम्ही शंभर वर्षांपर्यंत जगावे. ब्रह्मर्षी वसिष्ठांचे वसिष्ठ स्मृती, वसिष्ठ संहिता, ज्योतिषशास्त्र, वसिष्ठ धनुर्वेद, वसिष्ठ पुराण, वसिष्ठ शिक्षा, वसिष्ठ तंत्र हे ग्रंथही उपलब्ध आहेत. त्यांच्या स्मृतिग्रंथातूनही त्यांचे थोर द्रष्टेपण दिसून येते. त्यांनी आपल्या स्मृतिग्रंथात कृत्रिमरीत्या महागाई वाढवून जनस्वास्थ्य नष्ट करणाऱ्या समाजद्रोही प्रवृत्तीची तीव्र निर्भर्त्सना केली आहे. या ग्रंथातील खालील मंत्र तर सर्वांनी मुखोद्गतच करावा असा आहे, धर्मं चरत माSधर्मं सत्यं वदत माSनृतम् । दीर्घं पश्यत माऱ्हस्वं परं पश्यत माSपरम् ।। धर्माचे पालन करा, अधर्माच्या वाटेला जाऊ नका. सदा सत्यच बोला, कधीही असत्य बोलू नका, आपली दृष्टी विशाल असावी, संकुचित नसावी, कोणालाही परके समजू नये. सर्वांशी आत्मीयतेचे नाते असावे. अशा सन्मार्गाचा पुरस्कार करणाऱ्या ऋचेचे द्रष्टे ब्रह्मर्षी वसिष्ठ आहेत. त्यांची अजून एक ऋचा बघू या, शं नः अजः एकपात् देवः अस्तु शं नः अहिर्बुध्न्यः शं समुद्रः । शं नः अपां नपात् पेरुः अस्तु शं नः पृश्निः भवतु देवगोपा ।।ऋ.७,३५,१३ सूर्यदेवाचा पृथ्वीवर आलेला पहिला किरण म्हणजेच अज एकपाददेव आम्हाला कल्याणकारी असो. सर्वाधार व अक्षय असा अहिर्बुध्न्य अग्नी व सप्तसागर आम्हाला कल्याणकारक होवोत. संकटातून पार करून नेणारा व अपांनपात् मेघामधून पाणी वाया न घालवणारा असा कल्याणकारी अग्निदेव आमचे रक्षण करून मनःशांती देवोदेवांकडून संरक्षित व पालन केलेली भूमाता व गोधन आम्हाला शांती प्रदायक होवोत. ब्रह्मर्षी वसिष्ठांचे अथर्ववेदातील अजरक्षत्र म्हणजे तीक्ष्ण ब्राह्मतेजाचे आणि दुर्दम्य क्षात्रवृतीचे तेजस्वी सूक्त ऐकून मन आदराने भरून जाते. याचा मी भावानुवाद केला आहे. संशितं म इदं ब्रह्म संशितं वीर्यं बलम् । संशितं क्षत्रमजरमस्तु जिष्णुर्येषामस्मि पुरोहितः ।।१।। समहमेषां राष्ट्रं स्यामि समोजो वीर्यं बलम् । वृश्चामि शत्रूणां बाहूननेन हविवाहम् ।।२।। नीचैः पद्यन्तांधरे भवन्तु ये नः सूरिं मधवानं पृतन्यान् । क्षिणामि ब्रह्मणामित्रानुन्नयामि स्वानहम् ।।३।।अथर्व.का.३सू.२० ब्राह्मण्य तीक्ष्ण व्हावे आमचे, तेज वाढो या मंत्राचे। आमचे बल, वीर्य आमचे, व्हावे ओजस्वी ।। जेथे आम्ही ज्ञानोपासक, त्या राष्ट्राचा आमुचा शासक । क्षात्रतेजाला त्याच्या चमक, रहावी नेहमी ।। आमुच्या ज्ञानदानाद्वारे, संपन्न होई राष्ट्र सारे । ज्याच्यापुढे शत्रू थरारे, ऐसे सैन्य तेजस्वी ।। आमच्या राष्ट्रधनावर, महनीय ज्ञानवंतावर । वाकडी झाली ज्याची नजर, तो संपला तत्क्षणी ।। असे हे ब्रह्मर्षी वसिष्ठांचे महनीय दिव्य व्यक्तित्व आणि साहित्य आहे. (उत्तरार्ध)

Comments
Add Comment

Horoscope: कर्क राशीत शुक्राचे गोचर, या तीन राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. सुख,

उत्सव गणेशाचा, ठेवा संस्कृतीचा...

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. सार्वजनिक

जगायचं कुणासाठी?

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. मोठा होत असताना घरी, शाळेत,

आनंदाचा शोध

सद्गुरू वामनराव पै हिंदू संस्कृतीने देव सर्वत्र भरला आहे ही संकल्पना मांडलेली असली तरी प्रत्यक्षात त्याचा

‘तिथे पूजा जन्मते’

ऋतुराज : ऋतुजा केळकर ‘पूजा’ एक शब्द, एक श्वास... शब्दांशिवाय चालणाऱ्या पूजेस, विखुरलेल्या मनाला देवाचा मूक स्वीकार

बुधचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन, 'या' राशींसाठी ३० ऑगस्ट ठरणार शुभ

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडते. ३०