पालघर: बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायू गळतीमुळे ८ कामगारांना बाधा झाली असून, त्यामधील ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर इतर कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ १३ मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनी दुपारच्या सुमारास वायुगळतीची दुर्घटना घडली. ज्यात सदर ठिकाणी काम करत असलेल्या ८ जणांना बाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कामगारांची प्रकृती बिघडल्यानंतर त्या सर्वांना तातडीने नजीकच्या शिंदे या खाजगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र त्यांपैकी ४ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळतीची घटना घडलेली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅम्लीन फाईन सायन्सेस लिमिटेड कंपनीत वायू गळती झाल्याने ११ कामगारांना त्याची बाधा झाली. कंपनीत डायमिथाईल सल्फेटची गळती झाल्याने कामगारांना डोळे चुरचुरणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवल्या होत्या. त्यावेळी बाधित कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, यात जीवितहानी झाल्याकारणामुळे, बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.