मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, यामुळे शहरात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे.
घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विशेषत: सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे. लोकल वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज, आपत्कालीन मदतीसाठी १९१६ हेल्पलाईन सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचे सर्व उपाय केले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मुख्य नियंत्रण कक्षाचा १९१६ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी गरज भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिका प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.