
मुंबई: हवामान खात्याने मुंबईतील मुसळधार पावसाबाबत दिलेला इशारा अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. मुंबईत धुंवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घरातच थांबा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मुंबई तसेच उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने मंगळवारीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढच्या तीन ते चार तासांत मुंबईत अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान, मुंबईत जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील शाळा तसेच कॉलेजना सोमवारीच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बंगालचा उपसागरा कमी दाबाचे पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. हा पट्टा हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे मंगळवारी पावसाचा जोर मुंबईत कायम राहणार आहे. बुधवारपासून मुंबईतील पावसाचा जोर कमी होईल.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागांमध्ये पाणी भरू शकते.