रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख असलेल्या बावनदीने तर आपले पात्र ओलांडले असून, यामुळे वांद्री आणि उक्षी परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उक्षी मुस्लिम मोहल्ला आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे दोन्ही महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीत पुराचे पाणी आणि सोबत आलेला चिखल मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बावनदीची सध्याची पाणीपातळी ८.७७ मीटर एवढी आहे.
या पुरामुळे शेतीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.