भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून, स्थानिक महापालिकांच्या साफसफाईमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवलेली नाही. तरीही, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे.