नवी दिल्ली: अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या दौऱ्याची सुरुवात १२ डिसेंबर रोजी कोलकाता शहरातून होणार असून, यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे देखील भेट देणार आहे. या कार्यक्रमाचे प्रवर्तक सताद्रु दत्ता यांनी शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट) ही माहिती दिली. 'GOAT Tour of India 2025' असे नाव दिलेल्या या दौऱ्याद्वारे तो भारतातील फुटबॉलप्रेमींना भेटणार आहे, आणि त्यांना मार्गदर्शन देखील देणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे भारतातील फुटबॉलपटूसाठी तसेच लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मेस्सीचा ३ दिवसीय भारत दौरा कसा असेल?
दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेस्सी १२ डिसेंबर रोजी कोलकाताला पोहोचेल, तेथे दोन दिवस आणि एक रात्र तो राहील. दिनांक १३ डिसेंबर रोजी भेट आणि अभिवादन कार्यक्रमात तो सहभागी होईल. त्याच्यासाठी कोलकाता येथे एक खास जेवण आणि चहा महोत्सव असेल, ज्यामध्ये बंगाली मासे हिलसा, बंगाली मिठाई आणि आसाम चहाचा बेत आखला जाणार आहे. यानंतर, ईडन गार्डन्स किंवा सॉल्ट लेक स्टेडियममध्ये GOAT कॉन्सर्ट आणि GOAT कप आयोजित केला जाईल.
यानंतर दुसऱ्या दिवशी, मेस्सीला खास भेट म्हणून दुर्गापूजेदरम्यान, त्याचे २५ फूट उंच आणि २० फूट रुंद भित्तीचित्र ठेवले जाणार आहे, ज्यावर त्याचे चाहते त्याच्यासाठी संदेश लिहू शकतील. हे स्टेडियममध्ये मेस्सीला भेट म्हणून दिले जाईल. यादरम्यान तो प्रत्येक संघातील सात खेळाडूंचा सॉफ्ट टच आणि सॉफ्ट बॉल सामना खेळेल ज्यामध्ये सौरव गांगुली, लिएंडर पेस, जॉन अब्राहम आणि बायचुंग भुतिया यांचा देखील सहभाग असणार आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तिकिटाचा किमान दर ३५०० रुपये असणार आहे.
मेस्सी १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी अहमदाबादमध्ये अदानी फाउंडेशनच्या एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होईल.
'या' तारखेला मुंबईत येणार मेस्सी
अहमदाबाद दौऱ्यानंतर तो १४ डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे. जिथे दुपारी ३.४५ वाजता सीसीआय येथे 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम होईल. त्यानंतर, सायंकाळी ५.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर GOAT कप आणि कॉन्सर्ट होईल. मुंबईतील सीसीआय ब्रेबॉर्न येथे मुंबई पॅडल GOAT कपचा सामना आयोजित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सामन्यात मेस्सीसोबत शाहरुख खान आणि लिएंडर पेस पाच ते दहा मिनिटे मैदानात खेळू शकतात. ज्याचा अनुभव क्रीडा चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मेस्सी आणि सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासोबत GOAT कॅप्टन्स मोमेंट आयोजित करू शकते ज्यामध्ये रणवीर सिंग, आमिर खान आणि टायगर श्रॉफ देखील सहभागी होतील. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
२०११ नंतर मेस्सीचा हा पहिला भारत दौरा आहे, तेव्हा तो आपल्या राष्ट्रीय संघासोबत कोलकाता येथे व्हेंझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी आला होता. मेस्सीच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय फुटबॉलपटूंच्या पुढील पिढीला प्रेरणा देणे हा आहे. मेस्सी प्रत्येक शहरात मुलांसाठी 'मास्टरक्लास' घेणार आहे.