विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे, हा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, मुख्य सचिव राजेश कुमार, अमृता फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ, मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, भारतीय सेना, नौसेना, वायुसेना, भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे तळ उद्वस्त केले. त्यातून भारतावरील होणारे हल्ले परतवून लावले. यामुळे जगाला देखील नवीन भारत काय आहे, हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या-ज्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो.
आज भारताची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने ठोस पाऊल ठेवले आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातले जे उत्पादन आहे, ज्या व्यवस्था आहेत, त्या सगळ्या भारतामध्ये गुणवत्तापूर्ण तयार कराव्या लागतील. नवाचार, स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे उभ्या कराव्या लागतील. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशीचे आव्हान केले आहे. जिथे जिथे शक्य असेल, त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्याचे कार्य करायचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारतामध्ये थेट परदेशी गुंतवणूक येते, त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती राज्यामध्ये होत आहे. वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक मोठी विकासाची घोडदौड सुरू आहे. एकीकडे उत्तम अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने प्रयत्न सुरू केले आहेत. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेती व ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्यूटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हा प्रकल्प २०२६ च्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांना १२ तास दिवसाची वीज मिळेल. त्यावेळी १०० टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. विशेषतः नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा, नळगंगा योजना असेल, किंवा समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणे, विविध नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणणे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला, उद्योगाला, पिण्याचे पाणी देण्याकरता मुबलक अशा प्रकारचे पाणी साठे तयार करणारे महाराष्ट्र एक महत्त्वाचे राज्य होणार आहे.
आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने भरारी घेतलेली आहे. शेतीच्या क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, आपण शेतीचे क्षेत्र हे कशाप्रकारे त्या ठिकाणी फायद्याचं होईल, शेती कशी वातावरणाच्या बदलापासून संरक्षित करू शकू, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण या निमित्ताने करतो आहोत. स्मार्टसारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट इंटरव्हेन्शनच्या योजना असतील, यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांना एक चांगली व्यवस्था देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे.
गडचिरोली : नवीन स्टील हब
महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलांनी, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केलेले आहे. गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षल मुक्त, माओवादी मुक्त केले आहे. गडचिरोली हे आता देशाचे नवीन स्टील हब म्हणून तयार होत आहे. पुढच्या दहा वर्षांमध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी तयार होणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर
महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्ते, विमानतळ सोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे. हे बंदर जगातलं दहाव्या क्रमांकाच्या पहिल्या दहा बंदरामध्ये आहे. यामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मेरिटाइम पॉवर होणार आहे. त्याच वेळी पुणे, मुंबई, नागपूर, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विमानतळांचे, नवीन विमानतळ बांधणे किंवा आधुनिकीकरण हे कार्यसुद्धा सुरु आहे.
समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यातून महामार्गांचे जाळे तयार करतो आहे. त्यासोबत, एक हजार लोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे. आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे. त्या दृष्टीने येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संतांच्या मांदियाळींनी दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अनुरूप आपला महाराष्ट्र यापुढेही चालत राहील, अशा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर, त्यांनी मंत्रालयातील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त या समारंभात सांस्कृतिक संचालनालयाकडून प्रमुख सनई वादक कलाकार किरण शिंदे, सहकलाकार अरुण शिंदे, विवेक शिंदे यांनी सनई चौघडे वादन केले.