सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे — नीलम गोऱ्हे
मुंबई : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून “महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. या कार्यशाळेला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महिला दक्षता समित्यांचा यामध्ये सक्रिय सहभाग होता.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कार्यशाळेत सांगितले की, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. महिला दक्षता समित्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन, बीट कॉन्स्टेबल आणि सामाजिक संस्थांशी समन्वय साधून सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार याबाबत जनजागृती करताना कायदेशीर तरतुदींची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महिलांची जोखीम ओळखण्याची नैसर्गिक क्षमता समाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. ही निरीक्षणक्षमता केवळ घरापुरती मर्यादित नसून, सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः उत्सव आणि गर्दीच्या काळात, अत्यंत प्रभावी ठरते. महिलांचा सहभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यात वाढल्यास गुन्हे रोखणे आणि आपत्ती टाळणे अधिक सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महिला दक्षता समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी उभारलेल्या यंत्रणांची माहिती दिली. निर्भया पथक, महिला मदत कक्ष, स्पेशल जुवेनाइल युनिट, मोबाइल फॉरेन्सिक युनिट आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष या विभागांचा उत्सव काळात अधिक सक्रिय वापर होईल, असे त्यांनी सांगितले.
बॉम्बस्फोट विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली ओळखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले. “कोणतीही संशयास्पद वस्तू, पिशवी किंवा वाहन आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी गणेशोत्सव काळातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. पावसाळा आणि समुद्रातील भरती-ओहोटीच्या पार्श्वभूमीवर जलप्रलय किंवा इतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी १९१६ या हेल्पलाइनचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासगी सचिव अविनाश रणखांब यांनी केले, तर विशेष कार्य अधिकारी प्रशांत पिसाळ यांनी आभार मानले. कार्यशाळेतून महिलांची सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.