मुंबई : गेल्या काही दिवसापासून दादरमधील कबुतरखाना वाद पेटला असून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज चांगलाच आक्रमक झाला. या वादाला देखील मराठी विरुद्ध अमराठी असा रंग देण्याचा प्रयत्न झाला. या वादावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत उघड भूमिका घेतली मात्र राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती अखेर राज ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सुनावलं आहे. 'लोढा-बिढा सारखी माणसं मध्ये येत आहेत, लोढा काही एका समाजाचे मंत्री नाही. ते एक राज्याचे मंत्री आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी देखील न्यायालयाचा निर्णय मानला पाहिजे, असंही ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल असंही म्हटलं, जैन मुनींना देखील हे समजले पाहिजे. कबुतरांमुळे रोग होतात त्यामुळे कबुतरांना खायला घालू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे जे कोणी कबुतरांना खायला घालतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असं राज ठाकरे म्हणाले. सरकारने आणि कबुतरखान्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही उपाय मुंबई महानगरपालिकेला सुचवले होते. त्यामुळे काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचं आहे. या वादावर सरकारने लवकर तोडगा काढावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय.