ब्रह्मर्षी वशिष्ठ

  21


भारतीय ऋषी: डॉ. अनुराधा कुलकर्णी


शरद पौर्णिमेची रात्र होती. सरस्वती नदीकाठचा निसर्गरम्य प्रदेश शुभ्र चांदण्यात न्हाऊन निघाला होता. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या आश्रमाचा पावन परिसर खूपच आल्हाददायक वाटत होता. ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि त्यांच्या सहधर्मचारिणी अरुंधतीदेवी आपल्या आश्रमाच्या अंगणात सृष्टीसौंदर्यांची निर्मळ अनुभूती घेत होते. “किती रमणीय प्रकाश पडलाय नाही या चंद्राच्या चांदण्याचा!’’ अरुंधतीदेवी म्हणाल्या. त्यावर ब्रह्मर्षी उद्गारले “देवी, याहूनही रमणीय आणि खरा प्रकाश तुला अनुभवायचा असेल तर तू ब्रह्मर्षी विश्वामित्रांच्या थोर तपस्येचा प्रकाश पाहा. त्यांच्यासारखे तप आजवर कोणी केले नसेल...’’


ज्या झाडाखाली ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि अरुंधतीदेवी बसले होते, त्या झाडामागे विश्वामित्र वसिष्ठांना मारण्यासाठी शस्त्र उगारून लपून बसले होते. ब्रह्मर्षी वसिष्ठांचे बोलणे ऐकून त्यांच्या हातातले शस्त्र गळून पडले. ते ब्रह्मर्षींच्या सामोरी जात त्यांच्या चरणांशी वाकले. विश्वामित्रांना वर उठवित ब्रह्मर्षी वसिष्ठांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. त्या आलिंगनात पृथ्वीला सनाथ करणाऱ्या दोन महान विभूतींचे ऐक्य झाले होते. अखिल मानवजातीच्या, विश्वाच्या कल्याणकार्यासाठी शांतिब्रह्म वसिष्ठांना थोर तपस्वी महर्षी विश्वामित्रांची साथ मिळाली. त्या समयी क्रोधाचा, द्वेषाचा अंधःकार लयास जाऊन शुद्ध अध्यात्मिकतेचा प्रकाश उजळून निघत होता! त्या दोन्ही महान ऋषिवर्यांमधले जिवाभावाचे मैत्र अवघ्या जगासाठी भाग्यदायी ठरले...! या दोघांनी असंख्य सत्कर्मरूप यज्ञांचे पौरोहित्य केले. जनमानसाला सुसंस्कृतीचे वळण लावले, समाजाचे नेतृत्व करणाऱ्या राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला म्हणजे सर्वांनाच निरामय समृद्ध जीवन लाभेल, हा सनातन विचार या दोन्ही माहात्म्यांनी समाजात रुजवला, त्यामुळे राजसभांमध्ये ब्रह्मवेत्त्यांना मानाचे स्थान मिळू लागले. पृथ्विपती सम्राटही


ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि महान तपस्वी विश्वामित्र या दोहोंच्या ऋतंभरा प्रज्ञेने जाणले होते की पृथ्वी तलावर आदर्श सुराज्य निर्माण करण्यासाठी श्रीविष्णू अयोध्या नगरीत श्रीरामाच्या रूपात अवतरले आहेत, पण सांप्रत श्रीराम नाशिवंत संसाराविषयी अतिशय व्यथित आणि विरक्त झाले आहेत. धर्माची प्रतिष्ठापना करणाऱ्याला संसाराकडे पाठ फिरवून कसे चालेल? सुशासनास्तव त्याला कर्मप्रवृत्त करावेच लागेल. वसिष्ठऋषी तर रघुकुलाचे परंपरागत आचार्यच होते. त्यामुळे त्यांनी श्रीरामाला समग्र अध्यात्मासह कर्मयोगाचा उपदेश करावा आणि मग कार्यतत्पर झालेल्या श्रीरामाला विश्वशांतीच्या आड येणाऱ्या दुष्टांच्या संहारासाठी महर्षी विश्वामित्रांनी सारी अस्त्रशस्त्रविद्या द्यावी आणि साऱ्या जनांना श्रीरामरूपी आपला तारणहार गवसावा, अशी योजना या दोघा ब्रह्मर्षींनी आखली आणि प्रत्यक्षातही उतरवली. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी श्रीरामाला केलेला अप्रतिम उपदेश म्हणजेच योगवासिष्ठ ग्रंथ होय.


ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र एकत्र आल्यानंतर त्या दोघांनाही साक्षात भगवंतांचे सद्गुरू होण्याचे भाग्य लाभले. नाही तर त्या आधी हे दोघे ऋषिश्रेष्ठ एकमेकांसमोर घोर युद्धास्तव उभे होते. अर्वाचीन काळातील पहिले, दुसरे महायुद्ध आपल्याला चांगले ज्ञात आहे, महाभारतातीलही महायुद्ध आपल्या परिचित आहे. पण महाभारत काळाच्याही खूप आधी असेच एक महायुद्ध होऊन गेले, त्याची मात्र आपल्याला तितकीशी माहिती नसते. महाभारत युद्धाच्या अडीच हजार वर्षांपूर्वी हे महायुद्ध झाले. त्यास दाशराज्ञ महायुद्ध म्हणतात. या महायुद्धाचा उल्लेख ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात मिळतो. हे सातवे मंडल ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या नावावर आहे. ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि महर्षी विश्वामित्र या दोघांचा या महायुद्धाशी प्रत्यक्ष संबंध होता.


तृत्सू समुदायाचा बलाढ्य राजा सुदास याचे प्रमुख सल्लागार आधी विश्वामित्र होते, पण नंतर वसिष्ठांना हे पद मिळाले. तेव्हा विश्वामित्रांनी सुदास राजाविरुद्ध दहा राजांना एकत्र केले. त्या दहा राजांचा प्रमुख पुरुराजा होता. हे दहा राजे सुदासराजाविरुद्ध लढले म्हणून त्यास दशराज्ञ महायुद्ध म्हणतात. पुरुराजाचे युद्धातील मुख्य सल्लागार विश्वामित्र होते, तर सुदासराजाचे मुख्य सल्लागार वसिष्ठ होते. या युद्धात सुदासराजाचा विजय झाला. त्यामुळे विश्वामित्रांच्या मनात ब्रह्मर्षी वसिष्ठांबद्दल तीव्र अढी निर्माण झाली होती.


एकदा राजर्षी विश्वामित्र एक युद्ध जिंकून सेनेसह परतत असता वसिष्ठ आश्रमात आले, तेव्हा त्यांचे व त्यांच्या हजारो सेनेचे उत्तम आदरातिथ्य ब्रह्मर्षी वसिष्ठांनी केले. आपल्या हजारो सैनिकांच्या खाण्यापिण्याची, आरामाची इतकी तत्पर व्यवस्था करणे, रानात आश्रमात राहणाऱ्या वसिष्ठांना कसे शक्य झाले, असे कुतूहल विश्वामित्रांच्या मनात निर्माण झाले...


(पूर्वार्ध)


anuradh.klkrn@gmil.com


Comments
Add Comment

जीवनाचे गणित का चुकते?

जीवन संगीत: सद्गुरू वामनराव पै जगातील बहुतेक सर्व धर्म हे परमेश्वराला मानणारे आहेत. परमेश्वराला मानणारे

अपूर्णत्व

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य द्रुष्टीचा निर्माता हा ईश्वर आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट किती सुंदर बनवली

मौनात नादब्रह्माच्या लहरीत लोपते ‘मी’

ऋतुराज: ऋतुजा केळकर नाद’ म्हणजे केवळ कानांनी ऐकण्याचा अनुभव नाही तर तो अस्तित्वाच्या गाभ्यातून उठणारा आदिम

मिथ्या अहंकार सोडी जीवा...!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे संसार म्हणजे मुले-बाळे, घरदार नव्हेत. संसाररूपी सर्पाचे अहं व मम हे दोन विषारी दात

जन्माष्टमीनंतर 'या' ३ राशींचे नशीब चमकणार! १७ ऑगस्टपासून सुरू होणार सुवर्णकाळ

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव लवकरच आपलं नक्षत्र बदलणार आहे. जन्माष्टमीनंतर १७ ऑगस्ट

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी, पाहा कधी आहे चंद्रोदय

मुंबई: आज मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मंगळवारी