
येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६७२ शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न समित्या, खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि नाफेड केंद्राकडे दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रु.३५०/- जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजुर करण्याचा शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०२३ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र करण्यात आले होते. यामध्ये येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील एकूण ९६७२ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते.
याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अपात्र ठरलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारून नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे अशी मागणी दि.१२ जून २०२५ रोजी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली होतो. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय प्रकाशित करून येवला मतदारसंघातील प्रलंबित १६६८ शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.