जयपूर : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. खातू श्याम मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये ७ मुले आणि ४ महिलांसह ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जयपूर रुग्णालयात उपाचारासाठी पाटवण्यात आले आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते आणि खातू श्याम दर्शनासाठी गेले होते.
पिकअप वाहन आणि ट्रेलरच्या धडकेमुळे झालेल्या या अपघातात अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि दौसा प्रशासनाने जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयात दाखल केले आहे. दौसा एसपींनी सांगितले की, हा अपघात पहाटे ३:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान झाला. सर्व मृत उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील रहिवासी होते.
जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार म्हणाले की, हे प्रवासी खातू श्यामजी यांना भेटून उत्तर प्रदेशकडे जात होते. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर ८ जणांना जयपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेल्या पिकअप वाहन आणि ट्रेलर यांच्यातील धडकेमुळे हा भीषण अपघात घडला आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यातून एक्सवरुन माहिती दिली की, दौसा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात जीवितहानी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींवर त्वरित आणि योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देव मृत आत्म्यांना आपल्या कमळ चरणी स्थान देवो आणि जखमींच्या प्रकृतीती लवकर सुधारणा होवो.