गेल्या आठ महिन्यांत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे होणार की शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले होणार याची अधून-मधून चर्चा सुरूच असते. कधी मंत्री भरत गोगावलेच पालकमंत्री होणार असा दावा करत राहिले, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही मंत्री अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री होतील असे वारंवार म्हटले जात होते.
नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा महायुतीची सत्ता स्थापन झाली. महाराष्ट्रातील रायगड, नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची चर्चा आजही होतेच आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यावर आजवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे नेहमीच प्राबल्य राहिले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे होता होता राहिले. गेल्या आठ महिन्यांत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे होणार की शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले होणार याची अधून-मधून चर्चा सुरूच असते. कधी मंत्री भरत गोगावलेच पालकमंत्री होणार असा दावा करत राहिले, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही मंत्री अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री होतील असे वारंवार म्हटले जात होते. पालकमंत्र्यांकडे त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनावर अंकुश ठेवता येतो. प्रशासनदेखील पालकमंत्र्यांच्या अधिकारावर काम करत राहते. त्यामुळेच पालकमंत्री आपल्याच पक्षाचा असला पाहिजे यासाठी दोन्ही बाजूकडून आग्रही भूमिका मांडली जाते. आता आणखी आठवड्याभरातच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आहे. यामुळे साहजिकच रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय पुन्हा चर्चेत आला.
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान कोणाला प्राप्त होणार, कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याची चर्चा होऊ लागली. यातच शिवसेना शिंदे गटांचे नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोजगारहमी मंत्री भरत गोगावले पालकमंत्री होतील असे म्हटल्याने हा विषय पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चेत आला. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगट यांचे प्राबल्य आहे. यामुळे पालकमंत्रीपद कोणीही सहजा-सहजी सोडायला तयार नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाला रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावं असे वाटत राहते. यामुळे तशा प्रकारचे प्रयत्न होत राहिले आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पालकमंत्रीपदाचा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात कोणतेही मुद्दे कशाही पद्धतीने जरी ऐरणीवर आले तरीही युती आघाडीतील घटक पक्षांचे राजकारण हे नेहमीच समझोत्यांचे राहिले आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत जरी कितीही ताणा-ताणी होतेय असं वाटत असलं तरीही हा पालकमंत्रीपदाचा विषय समझोत्याने हाताळला जाईल यात कुणाला शंकाही वाटत नाही. याच कारण ‘राजकारणामध्ये दिर्घकाळ कोणीही कोणाचा मित्र नसतो की कोणीही कोणाचा शत्रू नसतो’ त्यामुळे जे काही होते ते समझोत्यानेच होत असतं आणि पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या राजकारणात समझोता एक्स्प्रेस धावताना दिसेल.
कोकण रेल्वेची रो-रो कार वाहतूक...!
कोकणात गणेशोत्सव, शिमगोत्सव हे कोकणच्या जीवाभावाचे सण जवळ आले की, मग कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांच्या प्रवासाची चर्चा होते. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याची चर्चा होते. यातच मग राज्याचे जे कोणी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील त्यांचे गणेशोत्सवाच्या पूर्वी चार-सहा कोकण दौरे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी या वर्षअखेरीस महामार्ग पूर्ण होण्याचे नवे आश्वासन दिले जाते. हा महामार्ग कधी पूर्ण होईल हे फक्त साक्षात त्या परमेश्वरालाच माहीत; परंतु कधी-कधी एक दरवाजा बंद झाला असं आपणाला वाटते तेव्हा दोन-दोन पर्याय त्यासाठी निर्माण होतात असच काहीसं कोकणातील मुंबईकर चाकरमानी प्रवाशांसाठी म्हणता येऊ शकेल. कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच कोकण रेल्वेने रो-रो कार सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोकण रेल्वेच्या या रो-रो कार सेवेत या पहिल्याचवेळी सर्वकाही आलबेल असेल असं निश्चितच होणार नाही; परंतु जर कोकण रेल्वेचा रो-रो कार सेवेचा प्रयोग यशस्वी झाला, तर निश्चितच भविष्यातही त्याचा विचार होऊ शकेल.
कोकण रेल्वेच्या रो-रो कार सेवेला कोलाड ते नांदगाव आणि वेर्णा अशी ही रो-रो सेवा कोकण रेल्वे देणार आहे. सिंधुदुर्गातील नांदगाव रेल्वे स्टेशनला या रो-रो कार सेवेचा थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गाची जेव्हा आखणी करण्यात आली तेव्हा कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन हे जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून संबोधले गेले आहे. याच नांदगाव रेल्वे स्टेशनवरून नियोजित पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नकाशावर नांदगाव जंक्शन म्हणून रेकॉर्डवर असलेले रेल्वे स्टेशन केवळ नांदगाव रोड रेल्वे स्टेशन म्हणून प्रवाशांच्या रेल्वे प्रवासात माहितीचे झाले होते. याचं कारण फक्त एक-दोन रेल्वे गाड्यांनाच नांदगाव रेल्वे स्टेशनचे थांबे आहेत. अन्यथ: कोकण रेल्वे मार्गावरच्या प्रवासात रेल्वे क्रॉसिंगसाठी या नांदगाव रेल्वे स्टेशनरोडवरील रेल्वे ट्रॅकचा वापर होतो. खरं तर रेल्वे ‘क्रॉसिंग’ पॉईंट म्हणायला काहीच हरकत नाही; परंतु कधी-कधी चांगल्या कामाचीही वेळ यावी लागते. ती कोकण रेल्वे रो-रो कारसेवेच्या निमित्ताने प्रगतीची वेळ आली आहे. असं म्हटल तर निश्चितच गैर ठरणार नाही. नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच सिंधुदुर्ग कृषी बाजार समितीच मार्केट यार्ड उभं राहतय. त्यामुळे भविष्यात निश्चितच कोकणातील नांदगाव जंक्शन रेल्वे स्टेशन कोकण रेल्वे मार्गावरील अतिशय महत्त्वाचे रेल्वे स्टेशन होईल यात शंका नाही. कोकण रेल्वेने रो-रो कारसेवेच सुतोवाच केलं तेव्हा ही रेल्वे रो-रो कारसेवा थेट वेर्णा-गोवा येथेच थांबणार होती; परंतु जेव्हा कोकणातील खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भारताचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून कोकणाला रो-रो रेल्वे कार सेवेचा काहीच उपयोग होणार नाही हे जेव्हा निदर्शनास आणून दिले तेव्हा कोकणातील नांदगाव रेल्वे स्टेशनला रेल्वे रो-रो कार सेवेला थांबा देण्यात आला आहे. या रो-रो रेल्वे कार सेवेला मुंबईकर कोकणवासीय कशापद्धतीने प्रतिसाद देतात त्यावरच या रो-रो कार सेवेच भवितव्य ठरणार आहे.
- संतोष वायंगणकर