मुंबई: एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि गैरउड्डाण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी ५८ वर्षे होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी ५८ वर्षांवरून वाढवून ६५ वर्षे आणि गैरउड्डाण (नॉन-फ्लाइंग) कर्मचाऱ्यांसाठी ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आली आहे.
एअर इंडियामधील वैमानिकांसाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे असले तरी, त्यापैकी बहुतेकांचा कार्यकाळ ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आला होता, जो व्यावसायिक वैमानिकांसाठी विमान वाहतूक नियामक डीजीसीएने परवानगी दिलेली कमाल मर्यादा आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी बैठकीत या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीतील अनुभवी कर्मचारी व त्यांचा अनुभव टिकवून ठेवण्यास मदत होईल. सध्या टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये २४,००० कर्मचारी असून, यात ३,६०० पायलट आणि ९,५०० केबिन क्रू मेंबर्सचा समावेश आहे.
नवीन निर्णयात केबिन क्रूच्या सेवानिवृत्तीच्या वयोमयदिबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यांची वयोमर्यादा ५८ वर्षे असून, भविष्यात त्यांच्या बाबतीतही निर्णय होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाले होते. त्या वेळी विस्ताराच्या पायलटचे सेवानिवृत्तीचे वय जास्त असल्याने एअर इंडियाच्या काही पायलटांमध्ये वयातील असमानतेवरून नाराजी होती. आता एअर इंडियाने हा निर्णय घेऊन ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.