शहाणपण

  15

जीवनगंध : पूनम राणे


दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत होती, पण तो काहीच बोलत नव्हता. बाबा कामावरून आल्यानंतर सांगेन, असे सतत म्हणायचा.


बाबा कामावरून आले. चटकन त्यांच्या हातातील पिशवी दिनेशने आपल्या हातात घेतली. बाबांनी हातपाय धुतले, आईने चहा दिला. दिनेश हळूच आपल्या बाबांच्या बाजूला जाऊन बसला. दोन्ही हात एकमेकांवर, ठेवून मान खाली घालून, चेहरा रडवेला करून.


सारा धीर एकवटून तो बाबांना म्हणाला, “बाबा, मला उद्या शंभर रुपये हवे आहेत.” बाबा म्हणाले, “अरे कशाला!” दिनेश काहीच बोलला नाही. मला उद्या शंभर रुपये हवेत, एवढेच फक्त सारखा बोलत होता. आपल्याला रात्री झोपेपर्यंत शंभर रुपये मिळतीलच, याची दिनेशला खात्री होती; परंतु रात्री झोपेपर्यंत बाबांकडून त्याला शंभर रुपये मिळाले नाहीत.


त्याने मनाशी पक्का निर्णय केला होता, जोपर्यंत शंभर रुपये मिळत नाही तोपर्यंत शाळेत जायचेच नाही. बाबा सकाळी कामावर जायला निघाले. आता तरी त्याला वाटत होते, आपल्याला बाबा आवाज देतील आणि शंभर रुपये आपल्या हातावर ठेवतील; परंतु तसे काही घडले नाही. बाबा कामावर जायला निघाले. तसा दिनेश बाबांच्या मागे जाऊ लागला.


बाबा... बाबा... शंभर रुपये! म्हणून हात पसरू लागला.
बाबांनी मागे वळून पाहिले. आणि म्हणाले,“ दिनेश बेटा, तू घरी जा आणि शाळेत जा. शाळेचा खाडा अजिबात करू नकोस. अरे, मी तुला दोन दिवसांनी पैसे देतो; परंतु दिनेश ऐकतच नव्हता. बाबा त्याला सतत घरी जा म्हणत होते. तो मागे फिरण्याचे नाटक करत होता. बाबा जसे जसे पुढे जायचे तसा तो त्यांच्यामागून मागून जाऊ लागला. बाबांनी पुन्हा एकदा मागे वळून पाहिले, तर दिनेश आपल्या मागूनच चालत येत असलेला त्यांना दिसला. अरे, तुला घरी जायला सांगतोय!” ऐकतोस ना बाळा”... जा, घरी जा.
दिनेश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बाबांनी पाठ फिरवली की, दिनेश त्यांच्या मागून मागून जायचा. सारा धीर एकवटून दिनेशने पुन्हा हाक मारली, “बाबा... बाबा... शंभर रुपये...”


ती हाक ऐकून बाबांना काय करावे हेच कळेना. आपण आपल्या मुलाला शंभर रुपये देऊ शकत नाही याची खंत त्यांना वाटत होती आणि खर तर आज महिन्याचा शेवटचा दिवस होता. दोन दिवसांनी पगार होणार होता. खिन्न मनाने बाबांनी मागे वळून पाहिले, “दिनेशला जवळ बोलावले आणि आपले दोन्ही हात पँटीच्या दोन्ही खिशात घातले, दोन्ही रिकामे खिसे बाहेर काढून दाखवले आणि म्हणाले,” “खरं सांगतो बेटा, आज माझ्याकडे काहीही पैसे तुला द्यायला नाहीत.” असे म्हणून त्यांनी दिनेशला घट्ट मिठी मारली. बाबांच्या डोळ्यांतील दोन अश्रू दिनेशच्या अंगावर ओघळले. दिनेशला खूपच वाईट वाटले. “बाबा तुम्ही कामावर जा, मी शाळेत जातो.” असे म्हणून दिनेश मागे फिरला.


त्याचे असे झाले होते, कोरोना काळात बाबांची नोकरी गेली होती, म्हणून बाबांनी दिनेशला आपल्या भावाकडे गावाकडच्या शाळेत पाठवले होते. पण अभ्यासात त्याचे मुळीच लक्ष नव्हते. शाळेत जातो असे सांगून डोंगरावर जाऊन बसायचा. नदीतील खेकडे, मासे पकडायचा. या सर्व गोष्टींचा अभ्यासावर परिणाम होऊन तो नापास झाला. त्यामुळे दिनेशच्या काकांनी पुन्हा त्याला मुंबईत पाठवले.


दिनेशचे नाव मुंबईच्या शाळेत दाखल करण्यात आले. मधल्या सुट्टीत काही मुले रोज वडापाव खातात हे त्याच्या निदर्शनास आले. आपण मात्र चपाती भाजी खातो. वर्गातील काही मित्रांनी त्याला बऱ्याच वेळेला वडापाव खाऊ घातले होते. आपणही त्यांना एक दिवस वडापाव खायला द्यायचा, असा विचार करून त्याने बाबांकडे शंभर रुपयाची मागणी केली होती; परंतु खरी परिस्थिती लक्षात आल्यानंतर तो वर्गात मन लावून अभ्यास करू लागला.


शाळेत त्याचा पहिला नंबर येऊ लागला. शाळा सुटल्यानंतर सिग्नलवर फुटाणे शेंगदाण्याच्या पुड्या करून विकू लागला. असेच एके दिवशी सिग्नलवर शेंगदाणे, चणे विकताना त्याची एका कार मालकाशी ओळख झाली. कार मालकाला त्याची दया आली त्याने आपला मोबाइल नंबर त्याला दिला व म्हणाले, जेव्हा तुझे शिक्षण पूर्ण होईल. तेव्हा मला येऊन भेट. या वाक्याने दिनेशचा आत्मविश्वास अधिकच वाढला. तो जोमाने अभ्यास करू लागला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने कार मालकाला फोन केला. आपल्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट देऊ केली. आज दिनेश मोठ्या पदावर काम करून मुंबईत त्याने मोठे घर घेतले आहे. आई-बाबांना सुखात ठेवतो आहे. गरजू लोकांना मदत करून समाजाचे देणही फेडतो आहे.


तात्पर्य : हेच की, कधी-कधी प्रसंग आपल्याला वळण लावतात. मात्र प्रसंगाला वळण लावणारा दिनेशसारखा एखादाच असतो.

Comments
Add Comment

पसायदान

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा

ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई

कोकणी बाणा : सतीश पाटणकर वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे