पसायदान

  16

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर


आळंदीच्या ‘पसायदान गुरुकुला’तून बाहेर पडताना खूप प्रसन्न वाटत होते. आई-वडिलांचे छत्र हरवलेले, एकल पालक असलेले, गरीब आणि वंचित घटकातील ५ ते १५ वयोगटातील मुले मन लावून शिकत होती. त्यांचे उत्सुक चेहरे नव्या गोष्टी शिकण्यासाठी आसुसलेले दिसत होते.


आम्ही या मुलासाठी बिस्किटांचे पुडे नेले होते. तीन मोठ्या मुलांच्या हाती पुडे सोपवले. ते त्यांनी सर्वांना एकेक वाटून दिले आणि तिघांनीही उरलेले पुडे प्रामाणिकपणे परत केले. उरलेली वस्तू परत करणे आणि तीही गरज असताना हे किती अवघड आहे. मी म्हटले, ‘राहू द्या रे!’ तेव्हा तिथला एक मुलगा म्हणाला आम्हा सगळ्यांना मिळाले आहे. हे त्यांचे वागणे म्हणजे गुरुकुलाने त्यांच्यावर केलेले संस्कार दर्शवत होते. पसायदान गुरुकुलात पंचमुखी शिक्षण पद्धती अनुसरण्यात येते आहे.


या शिक्षण पद्धतीबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. पण प्रथम श्री योगेश वाघ ज्यांची ही संस्था आहे त्याबद्दल जाणून घेऊ या. योगेश वाघ हे मूळ वर्धा येथील रहिवासी. लहानपणी माता-पित्याचे छत्र हरपल्यामुळे त्यांचे पालनपोषण आजीने केले. त्यांनी पदवीनंतर एम.बी.ए. केले आणि नवी मुंबई येथील ‘धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी’त त्यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली होती. मुळात अध्यात्माकडे कल असल्यामुळे त्या नोकरीत मन रमेना. मग त्यांची भेट ‘स्वदेशी’ चळवळीचे डॉ. राजीव दीक्षित यांच्याबरोबर झाली व जीवनाला वेगळीच दिशा मिळाली.


राजीव दीक्षित यांच्याबरोबर समाजातले अनेक तरुण सामील झाले. आयआयटीमधील तसेच अनेक उच्चशिक्षित मुले स्वदेशीचा नारा देऊ लागली. योगेश वाघने आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडली पण पुढे अचानक डॉक्टर राजीव दीक्षित यांचे निधन झाले आणि चळवळीला मोठा हादरा बसला. विमनस्क अवस्थेत योगेश वाघ तीर्थक्षेत्री फिरू लागले. धार्मिक ग्रंथाचे वाचन करू लागले. फिरत फिरत ते आळंदीला पोहाेचले. तिथे त्यांना दोन मुले भेटली. ज्यांच्या डोक्यावर मातापित्याचे छत्र नव्हते. या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांना पंचमुखी शिक्षण देण्याचा संकल्प केला.


फक्त अन्न, वस्त्र, निवारा आणि शाळेतील शिक्षण याबरोबर त्यांनी पंचसूत्री जोडली. १. शारीरिक शिक्षण, २. मानसिक शिक्षण, ३. अध्यात्मिक शिक्षण ४. नैतिक शिक्षण ५. व्यावसायिक शिक्षण असे आवश्यक असल्याचे त्यांचे निरीक्षण होते.


स्वावलंबन हे पसायदान गुरुकुलाचे मुख्य ध्येय आहे. आई-वडील नसलेले, एकल पालक असलेले, ऊसतोडणी कामगारांची मुले, गरीब, वंचित घटकातली मुले अशी अनेक मुले संस्थेशी जोडली गेली. गेल्या ८ वर्षांत बघता बघता २ मुलांना घेऊन सुरू केलेल्या गुरुकुलात आता ६० मुले आहेत.


अनेक मुलांची दिशा चुकलेली असते. पुरेसे मार्गदर्शन नसल्याने ती भरकटतात. अशांना इथे शिक्षण दिले जाते. पसायदान गुरुकुल केवळ त्यांचे जीवनच वाचवत नाही, तर त्यांना आशेची नवी स्वप्नेही देते. इथे आलेली मुले ८० ते ९०% गुण मिळवून यशस्वी झालेली आहेत. सर्व मुले स्वावलंबी झाली आहेत. व्याख्यान, लेखन, गायनवादन, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात ती निपुण झाली आहेत.


त्यांना वाचनाची आवड लावण्यात आली आहे. इथे राहिलेल्या मुलांपैकी दोघांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:चा व्यवसायही सुरू केला आहे. ही सर्व मुले अत्यंत हलाखीच्या अवस्थेत इथे आली, त्यांना क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणाबरोबरच इतर कौशल्ये शिकविल्यामुळे आज ती स्वत:च्या पायावर उभी आहेत. ‘वात्सल्य परिवार’ आणि ‘टाटा समूहा’ने संस्थेला अन्नधान्य, शालेय साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची भरघोस मदत केली. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या परिस्थितीत आहेत.


त्यांच्यावर कोरोनाच्या काळात अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती. एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही मुले कशीबशी राहत, पण योगेश वाघ यांनी अतिशय धीराने परिस्थिती सांभाळली आणि सर्वांना आधार दिला. आज ऊसतोडणी कामगार, एकल पालक, गोरगरीब लोक जे मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत, असे अनेक जण त्यांची मुले पसायदानकडे पाठवतात. आता गरज आहे ती समाजातल्या दानशूर लोकांनी या मुलांसाठी आरोग्यसेवा आणि संस्थेला आर्थिक देण्याची!

Comments
Add Comment

शहाणपण

जीवनगंध : पूनम राणे दिनेश शाळेतून घरी आल्यापासूनच खूपच नाराज दिसत होता. आई त्याला खोदून खोदून विचारण्याचा

सृष्टीची निर्मिती

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ह्मदेवाने आपल्या विविध अंगापासून ऋषींची (मानसपुत्रांची) उत्पत्ती केली.

प्रथा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या

‘वो भारत देश है मेरा...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ए न. सी. फिल्म्सचा केदार कपूर दिग्दर्शित ‘सिकंदर-ए-आझम’ हा सिनेमा १९६५ साली आला.

पालकत्व आणि वैवाहिक आयुष्यातील समतोल

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू नवीन पालक होणे हा आनंद, प्रेम आणि नवीन अनुभवांनी भरलेला एक रोमांचक प्रवास असतो. हा

ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई

कोकणी बाणा : सतीश पाटणकर वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सोनवडे