
कथा :प्रा. देवबा पाटील
आज आदित्य आपल्या मनाशी काहीतरी ठरवूनच शाळेत गेला; परंतु सकाळी सुभाष त्याला शाळेत काही दिसला नाही. बघू दुपारच्या सुट्टीत, असा विचार करून आदित्य आपल्या मित्रांसोबत आपल्या वर्गात निघून गेला.
मधल्या सुट्टीत पुन्हा सुभाष त्या ठिकाणी आलाच. पण तो चुपचाप त्या दगडावर जाऊन बसला. त्याला बघून आदित्यने त्याला आपल्याकडे बोलावले. तो म्हणाला, “नाही दादा, रोजच मी तुमच्याजवळचे खाणे योग्य नाही वाटत मला.”
आदित्य म्हणाला, “अरे आता तू आमचा मित्र झाला आहेस. ये इकडे. आमच्यात येऊन बस.”
आदित्यचे ऐकून तो येऊन बसला. पुन्हा साऱ्यांनी त्याला आपल्या डब्यातील थोडी थोडी पोळीभाजी दिली. तो ती आनंदाने खाऊ लागला.
तो येऊन बसल्यानंतर “काही शास्त्रज्ञ तर म्हणतात की, सूर्यसुद्धा स्थिर नाही. याबद्दल तुला काही माहीत आहे का?” आदित्यने विचारले.
“तुम्हाला आकाशगंगांबद्दल काही माहिती असेलच.” सुभाषने विचारले.
“आकाशगंगांमध्ये अब्जावधी तारे आहेत व आपली सूर्यमाला ही त्यापैकी एक आहे, एवढेच आम्ही ऐकून आहोत.” आदित्य म्हणाला.
“बरोबर आहे ते दादा.” सुभाष सांगू लागला, “आकाशगंगेत आपल्या सूर्याचे स्थान हे तिच्या मध्यापासून बरेच दूर एका बाजूला आहे. या विश्वात कोणतीच गोष्ट स्थिर नाही. तसेच आपला सूर्यसुद्धा स्थिर नाही. सूर्यसुद्धा स्वत:भोवती सतत फिरत असतो. म्हणून तोही गोलाकारच दिसतो. स्वत:भोवती एक परिवलन पूर्ण करायला त्याला २५ दिवस लागतात. तसेच तो आपल्या सूर्यमालेसह आपल्या म्हणजे त्याच्या आकाशगंगेच्या केंद्राभोवतीही सतत फिरत असतो.
पण त्याचा फिरण्याचा वेग मात्र खूप कमी आहे. एवढ्या मोठ्या अफाट आकाशगंगेला तो केवळ २५० कि.मी. प्रतिसेकंद वेगाने प्रदक्षिणा घालत असतोे. आकाशगंगेत त्याला अशी एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २५ कोटी वर्षे लागतात. आपण पृथ्वीवर राहतो व पृथ्वीसह तो फिरत आहे म्हणून पृथ्वीसापेक्ष तो स्थिरच असतो. पृथ्वीच्या परिवलनाने मात्र तो आपणास चालताना वाटतो.”
“हे परिवलन म्हणजे काय आहे?” अंतूने विचारले.
“कोणत्याही ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला त्या ग्रहाचे परिभ्रमण असे म्हणतात, तर त्या ग्रहाच्या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेला त्या ग्रहाचे परिवलन असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीची स्वत:भोवती गिरकी घेण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात, तर पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या भ्रमणाला परिभ्रमण असे म्हणतात.” सुभाषने सांगितले.
“सूर्य हा पूर्वेकडूनच का उगवतो?” चिंतूने विचारले.
सुभाष सांगू लागला, “आपली पृथ्वी ही सतत सूर्याभोवती फिरत असते. त्याचवेळी ती स्वत:भोवतीही सदोदित फिरत असते. पृथ्वी स्वत:भोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत असते. पृथ्वीच्या परिवलनामुळेच आपणास सूर्य हा पूर्वेकडूनच उगवताना दिसतो व पश्चिमेकडे मावळतो. इतर ग्रहतारे, चंद्रचांदण्याही आपणास पृथ्वीच्या परिवलन दिशेमुळे पूर्वेकडूनच उगवताना भासतात व पश्चिमेकडे मावळताना दिसतात.”
“सूर्योदय व सूर्यास्त कसा होतो?” मोंटूने प्रश्न केला.
“सूर्योदय म्हणजेच सूर्याचे उगवणे आणि सूर्यास्त म्हणजे मावळणे. रात्रीनंतर सकाळी पृथ्वीचा जो भाग हळूहळू सूर्यप्रकाशात येऊ लागतो तेव्हा तेथे सूर्य हळूहळू क्षितीजाखालून वर येताना दिसतो, त्यालाच सूर्योदय म्हणतात, तर दिवसानंतर सायंकाळी ज्या भागात सूर्य हळूहळू क्षितीजाखाली जाऊ लागतो तेव्हा त्याला सूर्यास्त होत आहे असे म्हणतात. असा एका सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत दिवस असतो, तर सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत रात्र असते.” सुभाषने सांगितले.
एव्हाना साऱ्यांचे डबे खाऊन संपले. साऱ्यांनी नळावर जाऊन हात धुतलेत. आपापले डबे धुतले व पाणी पिऊन पुन्हा आपापल्या जागी येऊन बसलेत नि आपापले डबे आपल्याजवळ त्यातील पाणी नितरण्यासाठी उलटे करून ठेवले. त्या मुलानेही त्याच्या भाकरीचा कागद दूर कचऱ्यात फेकून दिला. तोही हात धुवून, पाणी पिऊन, त्याच्या शिदोरीचे कापड जोरजोराने वारंवार झटकून, त्याची घडी करून, त्याच्या दप्तरात नीट ठेवून त्यांच्याजवळ येऊन बसला नि मधली सुट्टी संपली.