संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
लंडनमध्ये घडलेली एक घटना... मार्गारेट थेंचरबाई पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या तिजोरीतून होणारा वायफळ खर्च कमी करण्याची मोहीम हाती घेतली होती. अवाच्या सव्वा वाढलेला सरकारी खर्च कमी कसा करता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमण्यात आली. त्या समितीतर्फे अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या-कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. हे अधिकारी-कर्मचारी नेमकं काय काम करतात? त्यांच्यावर आणखी कोणत्या जबाबदाऱ्या सोपवता येतील, त्यांची उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल याचा अभ्यास सुरू झाला. या समितीचा अभ्यास सुरू असताना त्यांना एक गोष्ट आढळली की इंग्लंडच्या राजवाड्यातर्फे एका तरुण माणसाची नियुक्ती झाली आहे आणि त्या माणसाचं काम काय, तर दररोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत राजवाड्यासमोरच्या बागेतल्या दगडीबाकावर बसून राहायचं.
बस्स... राजवाड्यासमोरच्या बागेतल्या दगडी बाकावर हा तरुण सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत नुसता बसून राहायचा आणि त्याला दरमहा सरकारतर्फे पगारही देण्यात येत होता. त्या माणसाची चौकशी सुरू झाली. ‘तू इथे काय काम करतोस?’ चौकशी अधिकाऱ्यांनी विचारलं.सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तीन तास या दगडी बाकावर बसून राहातो.’ त्या तरुणानं शांतपणे उत्तर दिलं.
आणखी काही काम ?’
‘अं हं. काहीच नाही.’ त्या तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं.
आता मात्र चौकशी करणारे अधिकारी बुचकळ्यात पडले. हा तरुण किती वर्षे काम करतोय? याची नेमणूक कुणी केली? कशासाठी केली? अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि या सगळ्यांचा शोध घेता घेता अधिकाऱ्यांना समजलं की हा तरुण गेली चार वर्षे इथं नोकरीला आहे. यापूर्वी त्याचे वडील हेच काम करीत असत. चाळीस वर्षे नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांच्याजागी ह्या तरुणाची नेमणूक झाली होती. वडिलांना सेवानिवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनही दरमहा नियमित मिळत होती. तसंच या तरुणाचा पगारही दरमहा त्याच्या बँकेच्या खात्यात जमा होत होता. आता मात्र चौकशी अधिकारी अधिकच चक्रावले. त्याच्या वडिलांची भेट घेण्यात आली. ते देखील हेच काम करीत होते. पण त्यांना आपण हे काम कशासाठी करतोय याची मात्र काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या नेमणूकपत्रामध्ये ते त्यांचे वडील म्हणजे या तरुणाचे आजोबा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नोकरीला लागले होते.
अधिकाऱ्यांचं डोकंच चालेना. आजोबांच्या जागी मुलगा आणि मुलाच्या जागी आता त्याचा मुलगा... काम काय तर राजवाड्यासमोरच्या दगडी बाकावर सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तीन तास फक्त बसून राहायचं. पण कशासाठी बसायचं हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं. ना आजोबांना, ना त्यांच्या मुलाला, ना या सध्या नोकरीत असलेल्या तरुण मुलाला...चौकशी अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कंबर कसली.
आजोबांच्या नियुक्तीपत्रावर सही करणाऱ्या माणसाचा शोध घेतला. पण तो माणूस तर कधीच मृत्यू पावला होता. पण त्याच्या जुन्या डायऱ्या आणि इतर रेकॉर्डवरून राजवाड्यातल्या एका डॉक्टरांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली होती असं कळलं. शिफारस करणारा डॉक्टरही आता जिवंत नव्हता. पुन्हा चौकशा, पुन्हा जाबजबाब, पुन्हा सगळे जुने रेकॉर्ड-कागदपत्रं आणि फायली धुंडाळणं...
आणि या सगळ्या मंथनातून जी माहिती बाहेर आली ती तर फारच धक्कादायक होती. फार फार वर्षांपूर्वी इंग्लंडच्या राणीला ताप आला होता. त्यावेळी राजवाड्यातल्या डॉक्टरांनी तिच्यावर औषधोपचार केले होते. त्या उपचारांनी आणि दहा-पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर राणी बरी झाली होती. राजवाड्यात हिंडू फिरू लागली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला सकाळच्यावेळी राजवाड्यासमोरच्या प्रशस्त बागेत जाऊन बसण्याचा राणीला सल्ला देण्यात आला होता. पण...
पण त्या बागेतले बाक दगडाचे होते. रात्रभरच्या थंडीमुळे ते बाक गारठल्यासारखे होत होते. अशा थंडगार बाकावर राणी बसली तर तिला पुन्हा थंडीचा-सर्दीचा त्रास होण्याची भीती होती म्हणून राणी येण्यापूर्वी त्या बाकावर एका माणसाला बसवून तो बाक गरम करावा या उद्देशानं एका माणसाची नेमणूक करण्यात आली होती. सरकारतर्फे त्याचं वेतन ठरवण्यात आलं होतं. पुढे... पुढे राणी खडखडीत बरी झाली. त्यानंतर ती वयोमानानुसार म्हातारी झाली. मरण पावली. पण तिच्यासाठी नेमणूक झालेला माणूस मात्र नोकरीला चिकटला तो चिकटलाच.
त्या माणसाच्या सेवानिवृत्तीनंतर त्याचा मुलगा आणि त्यानंतर त्याचा मुलगा... तीन पिढ्या त्या दगडी बाकावर सकाळी सहा ते नऊ बसून होत्या. पण आपण हे काम कशासाठी करतोय याची मात्र त्यांच्यापैकी एकालाही कल्पना नव्हती. इंग्लंडमधे घडलेली ही सत्य घटना आणि इंग्लंडमधेच कशाला या अशा प्रकारच्या घटना जगभरात सगळीकडेच घडताना आपण पाहतो. अशाच अनेक घटना आपल्या अवतीभवतीही घडत असतात. अनेकदा तर आपणही अशा घटनांत सक्रिय सहभागी होतो. नेमकं कारण ठाऊक नसताना अनेक गोष्टी करतो. कारण विचारायचं तर कुणाला? ज्याला विचारावं तो देखील आपल्याइतकाच ‘(अ) ज्ञानी’ असतो.
बरं स्वतः कारण शोधून काढावं तर त्यासाठी लागणारी चिकाटी, वेळ आणि इच्छा आपल्याजवळ नसते. म्हणूनच आपण अशाप्रकारच्या गोष्टींची कारणमीमांसा न करता सगळ्यांना परंपरेचं लेबल लावून मोकळे होतो. गोष्टी जशा चालत आल्या आहेत तशाच स्वीकारतो आणि पुढे चालू ठेवतो. अनेकदा या प्रथांना धार्मिकतेचं स्वरूप दिलं जातं. धार्मिक प्रथा म्हटली की त्यात ढवळाढवळ करायला कुणी सहसा धजावत नाही. एखाद्या विज्ञाननिष्ठ माणसानं धार्मिक प्रथांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करून प्रश्न विचारले तर सनातनवाद्यांच्या भुवया उंचावल्या जातात. तथाकथित संस्कृतीरक्षक आपल्या बाह्या सरसावतात.
पण खरंच सांगा, आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुजाण माणसांनी विचार करायला नको का? आपणच आपल्याला प्रश्न विचारायला नकोत का? वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची फांदी तोडून तिची घरी पूजा केल्यानं नेमकं काय साध्य होतं? दसऱ्याच्या दिवशी आपट्याची सगळी पानं ओरबाडून एकमेकांना वाटून आपण नेमकं काय साधतो? होळीच्या निमित्तानं चांगली झाडं तोडून कशासाठी जाळतो? पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या जिवंत वृक्षाला तोडून अन् जाळून आपण प्रदूषणात भर घालणं योग्य आहे का? गंगेचं प्रदूषित पाणी खरोखरीच तीर्थ म्हणून प्यावं का? गणेशचतुर्थीच्या रात्री चंद्र पाहिला तर खरोखरीच चोरीचा आळ येतो का? विवाहात कन्यादानाचा विधी खरोखरीच आवश्यक आहे का? मिरवणुकीत गुलाल उधळून आपण काय साधतो? दिवाळीला ध्वनिप्रदूषण-वायूप्रदूषण करणारे फटाके वाजवायची गरज असते का? अमुकच ठिकाणचा गणपती ‘राजा’ असतो अन् तो ‘राजा’ गणपती नवसाला पावतो हे कितपत खरं आहे? की या श्रद्धेचं पद्धतशीर मार्केटिंग करण्यामागे त्या गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दडलेले असतात ?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न... जर आपण नीट विचार केला तर असे अनेक प्रश्न आपण उपस्थित करू शकतो. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर अनेक प्रथा आणि रूढी या आज कालबाह्य झाल्याचं आपल्याला आढळेल. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मेलेल्या माणसाचा देह स्मशानात नेताना तिरडी बांधायची पद्धत पूर्वीच्या काळी योग्य असेलही कदाचित, पण आता स्ट्रेचर्स उपलब्ध असताना आणखी बांबू अन् झावळ्यांची तिरडी कशासाठी? पूर्वीच्या काळात घरातून स्मशानात अग्नी नेण्याची आवश्यकता असेलही कदाचित, पण आता इलेक्ट्रिकवर दहन करण्याची सोय असताना मडक्यातून अग्नी नेण्याची गरज खरोखरीच असते का?
एक आनंदोत्सव म्हणून घरात एखाद्या इष्ट देवतेची पूजा करणं आणि त्यानिमित्ताने नातेवाइकांना-आप्तांना आपल्या घरी बोलावणं, गोडधोड जेवण करणं वेगळं. पण सत्यनारायणाचा प्रसाद खाल्यामुळे बुडालेली बोट वर येत नाही हे ठाऊक असूनदेखील ती भाकडकथांची पोथी वाचणं कितपत योग्य आहे? काळाच्या गतीबरोबर अनेक गोष्टी कालबाह्य होत असतात. तशा त्या झाल्याच पाहिजेत. पण दुर्दैवानं तसं होत नाही. केवळ परंपरा म्हणून अनेक गोष्टी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत राहतात. हे आपणच कुठंतरी थांबवायला हवं. लंडनमधल्या राजवाड्यासमोरच्या बागेत सकाळी तीन तास बाकावर बसणाऱ्या माणसाच्या गोष्टीवरून थोडातरी बोध घ्यायला हवा.