बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलची एन्ट्री
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय समीकरणांना वेग आलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर आल्याच्या घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरताहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी हातमिळवणी करत ‘उत्कर्ष पॅनल’ उभं केलंय. ही ठाकरे बंधूंची पहिलीच अधिकृत निवडणूक युती मानली जाते. १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी स्पर्धा आहे. ठाकरे गट १९ जागांवर आणि मनसे फक्त २ जागांवर लढणार आहे. या प्रमाणामुळे ठाकरे गट ‘मोठा भाऊ’ ठरला असून, मनसेला मर्यादित जागांवर समाधान मानावं लागलंय. विजयासाठी किमान ११ जागांची आवश्यकता आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष या लढतीत विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताहेत.
बेस्ट पतपेढीची निवडणूक ही जरी कामगार संघटनांशी निगडित असली, तरी या निवडणुकीतले निकाल हे मुंबई आणि महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांना दिशा देऊ शकतात. कारण, या युतीचा प्रभाव पुढे होणाऱ्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत उत्साह असून, नेत्यांकडूनही सकारात्मक संकेत मिळताहेत. मात्र अद्याप अधिकृतपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती जाहीर झालेली नाही.
महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या लाल ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय शैली, कार्यपद्धती आणि मतदारांवरचा प्रभाव वेगळा असला तरी, या युतीमुळे एकत्रितपणे मतदारांमध्ये नवा उत्साह आणि विश्वास निर्माण होऊ शकतो. शिवसेनेतून फुटून गेल्यानंतर मनसेला स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अडचणी आल्या होत्या, तर उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाच्या बंडानंतर मतदारसंघ टिकवण्यासाठी नव्या रणनीतीची गरज भासतेय. अशा वेळी ही युती परस्परपूरक ठरू शकते.
जर बेस्ट पतपेढी निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनल’ला यश मिळालं, तर ते दोन्ही पक्षांसाठी आत्मविश्वास वाढवणारं ठरेल आणि महापालिका निवडणुकांसाठी हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. मात्र, ही युती किती टिकेल आणि पुढील निवडणुकांमध्ये किती प्रभावी ठरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय. सध्या तरी, ठाकरे बंधूंची ही पहिलीच युती महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवा रंग भरणारी ठरतेय.