Friday, August 8, 2025

Low Budget Movie : हिरो कोण, व्हिलन कोण? शेवटच्या मिनिटाला उलगडणारा सस्पेन्स; ३ कोटींमध्ये बनून १७ कोटी कमावलेला सिनेमा

Low Budget Movie : हिरो कोण, व्हिलन कोण? शेवटच्या मिनिटाला उलगडणारा सस्पेन्स; ३ कोटींमध्ये बनून १७ कोटी कमावलेला सिनेमा

सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील कथा प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आल्या आहेत. मोठ्या पडद्यावर असो किंवा OTT प्लॅटफॉर्मवर, अशा प्रकारच्या रहस्यमय, थरारक आणि मेंदूला चालना देणाऱ्या कथा सतत प्रेक्षकांसमोर येत असतात. परंतु, सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांची दाद मिळत नाही. काही मोजक्या चित्रपटांनाच त्यांच्या दमदार पटकथा, जबरदस्त अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शनामुळे विशेष स्थान मिळते. अशाच एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाने अलीकडेच आपल्या ताकदीच्या कथानकामुळे आणि प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली असून, त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.


या चित्रपटाने नुकताच ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. या यशामुळे केवळ चित्रपटाची टीमच नव्हे तर थ्रिलर शैलीच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. हा चित्रपट मानवी मनाचे गुंतागुंतीचे पैलू, मानसिक ताणतणाव आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असून, सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपटाचं नाव, कलाकार आणि कथानकाबद्दलची अधिकृत माहिती जाहीर होताच प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला आहे. अनेकांना हा चित्रपट थिएटर किंवा OTT वर पाहण्यासाठी आता अक्षरशः दिवस मोजावे लागतील. हा पुरस्कार जिंकल्यानंतर, या चित्रपटाने सायको थ्रिलरच्या जगतात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरण्यात यश मिळवलं आहे.



नायक कोण आणि खलनायक कोण?


हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट विशेष ठरतो, कारण तो अतिशय कमी बजेटमध्ये तयार झाला असूनही बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक यश मिळवतो. आपल्या खर्चाच्या तब्बल सहापट कमाई करून या चित्रपटाने निर्मात्यांची चांदी केली आहे. सर्वसाधारणपणे थ्रिलर चित्रपट म्हटले की त्यात खून, रक्तपात किंवा धक्कादायक हिंसाचाराची दृश्यं असतात, पण या चित्रपटाने त्या साच्यातून बाहेर पडत वेगळा मार्ग अवलंबला आहे. यात कुठलाही खून नाही, अश्लील किंवा उघड दृश्येसुद्धा नाहीत. तरीही कथानक इतकं रोमहर्षक आहे की प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळून राहतात. या कथेत दोन व्यक्तींमधील एक विचित्र आणि टोकाची सनक दाखवली आहे. त्यांची परस्परांवरील चीड इतकी वाढते की ते एकमेकांना संपवण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. चित्रपटाचा सर्वात मोठा थरार म्हणजे, क्लायमॅक्सपर्यंत तुम्हाला नायक कोण आणि खलनायक कोण हे ओळखता येत नाही. पात्रांच्या मनोवृत्ती, त्यांच्या कृती आणि परिस्थितीतील अनपेक्षित वळणं इतकी गुंतागुंतीची आहेत की प्रेक्षक सतत अंदाज बांधत राहतात. शेवटी सत्य उलगडताना होणारा धक्का हीच या चित्रपटाची खरी ताकद ठरते.



७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गाजलेल्या सायकोलॉजिकल थ्रिलर ‘पार्किंग’ ने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली. या चित्रपटाने सर्वोत्तम तमिळ चित्रपटाचा मान मिळवला असून, त्याचबरोबर चित्रपटातील महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या मुथुपेट्टई सोमू भास्कर यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एम. एस. भास्कर यांनी आपल्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले. आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, “हा दिवस मी कधीच विसरणार नाही. ‘पार्किंग’ने दाखवून दिलं की एका छोट्याशा भांडणाचं किती मोठं आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात.” त्यांनी पुढे सांगितलं की, या चित्रपटाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला नवी ओळख आणि नवा आयाम दिला आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेला आणि आश्चर्यकारक कमाई करणारा ‘पार्किंग’ आता तमिळ चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जात आहे.



३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तब्बल १७ कोटींची कमाई


एम. एस. भास्कर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, “हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. ‘पार्किंग’मध्ये भूमिका साकारण्याचा अनुभव हा माझ्या अभिनय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम आणि आता मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार – या दोन्ही गोष्टींनी माझं मन आनंदाने भरून आलं आहे.” या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये भास्कर यांच्यासोबत हरीश कल्याण आणि इंदुजा रविचंद्रन यांसारखे गुणी कलाकार झळकले आहेत. कमी खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक यश मिळवले. फक्त ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या ‘पार्किंग’ ने तब्बल १७ कोटी रुपयांची कमाई केली. यशाची ही घोडदौड फक्त चित्रपटगृहांपुरती मर्यादित राहिली नाही; OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला.



नक्की काय आहे कहाणी?


'पार्किंग'ची कथा अगदी साध्या पण थरारक प्रसंगावर आधारित आहे, एका घरात राहणारे दोन भाडेकरू, ज्यांच्यातील वाद फक्त गाडी पार्किंगवरून सुरू होतो. खाली राहणाऱ्याकडे स्कूटर तर वर राहणाऱ्याकडे कार असते. सुरुवातीला हलकासा वाद असलेली ही गोष्ट, दिवसेंदिवस चिघळत जाते. पार्किंगसाठी दोघे इतके वेडे होतात की आपल्या ऑफिसलाही न जाता, फक्त आधी गाडी लावण्यासाठी स्पर्धा करू लागतात. एकमेकांना जिंकवण्यासाठी ते गाड्या फोडण्यापर्यंत जातात. एवढ्यावरच न थांबता, हा संघर्ष त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचतो. शेवटी, या तणावाचा परमोच्च बिंदू चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये उलगडतो, जो प्रेक्षकांना पूर्णपणे हादरवून टाकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >