
मुंबई: लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' चा दुसरा सिझन 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2'ने टीव्हीच्या दुनियेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मालिकेने आपल्या लॉन्चच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल १.६ अब्ज मिनिटांचे व्ह्यूज मिळवून मोठा इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही काल्पनिक मालिकेने इतके व्ह्यूज मिळवलेले नाहीत.
एकता कपूर निर्मित या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेची घोषणा झाल्यापासूनच ती प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय होती आणि आता प्रदर्शित झाल्यानंतर तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या प्रेमामुळेच मालिकेने टीआरपी चार्टमध्ये पहिल्याच आठवड्यात नंबर १ चे स्थान पटकावले आहे. इतकेच नव्हे, तर या मालिकेने अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या 'अनुपमा'सारख्या मालिकांनाही मागे टाकले आहे.
एका अहवालानुसार, मालिकेने पहिल्या आठवड्यात १.६५९ अब्ज मिनिटांचे व्ह्यूज मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, चार दिवसांत ३१.१ दशलक्ष प्रेक्षकांनी ही मालिका पाहिली आहे. मालिकेला मिळत असलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल अभिनेत्री आणि आता राजकारणी असलेल्या स्मृती इराणी यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' ने केवळ एका आठवड्यात जे करून दाखवले आहे, ते आजपर्यंत कोणत्याही मालिकेसाठी शक्य झाले नव्हते.