नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तवर पाकिस्तान संघाने भारतात येण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. आगामी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत हॉकीतील आशिया कप स्पर्धा नियोजित आहे.
बिहारमधील राजगीर येथे होणारी ही स्पर्धा नेदरलंड आणि बेल्जियम यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या २०२६ च्या हॉकी वर्ल्ड कपच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा जिंकणारा संघ हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. यासंदर्भातील माहितीनुसार भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना या स्पर्धेसाठी व्हिसा देण्याची तयारी दर्शवली होती. पण पाकिस्तान हॉकी महासंघाने सुरक्षिततेच्या कारणास्तवर भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यानंतर भारतीय हॉकी महासंघाने पाकिस्तानच्या जागी बांगलादेशच्या हॉकी संघाला या स्पर्धेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
आशिया कप हॉकी स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्याशिवाय चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि ओमान आणि चीनी ताइपे अर्थात तैवान या आठ संघांचा समावेश आहे. पाकिस्तान हॉकी संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्यामुळे आता त्यांच्या जागी बांगलादेश संघाच्या या स्पर्धेत एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रातील अनेक स्पर्धांवर उमटताना दिसत आहे. क्रिकेटमधील आशिया कप स्पर्धेवरही संकटाचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळेच भारताकडे यजमानपद असूनही ही स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.