Monday, October 20, 2025
Happy Diwali

खाडी बुजवली, मासेमारी संपली…!

खाडी बुजवली, मासेमारी संपली…!

कोळी समाजाच्या उपजीविकेवर ‘विकासा’चे काळे वादळ

ठाणे  : ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या उपजीविकेला विकासाच्या नावाखाली मोठा धक्का बसत आहे. खाडी व खाजण क्षेत्रांमध्ये झपाट्याने चाललेल्या शहरविकास, बंदर प्रकल्प, खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक पर्यावरण दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे. त्यामुळे शतकानुशतक चालत आलेला कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, रोजगाराचा मुख्य आधार हिरावला जात आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय कोळी समाज (नोंदणीकृत), दिल्लीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी, ठाणे यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले. राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण २०२० चा संदर्भ देत, पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करण्याच्या मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, खाडी किनाऱ्यावर वास्तव्यास असलेल्या कोळी समाजाचे जीवनचक्र पूर्णतः मासेमारीवर आधारित आहे. मात्र सध्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या प्रकल्पांमुळे त्यांचे नैसर्गिक जलस्रोत, जाळी टाकण्याच्या जागा, मासे प्रजनन क्षेत्रे आणि विक्रीसाठी लागणाऱ्या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत चालल्या आहेत. परिणामी शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, मच्छीमार समाजात अदृश्य बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

या निवेदनावर ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद कोळी यांच्या स्वाक्षरीसह मागण्या सादर केल्या गेल्या असून, शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पारंपरिक मासेमारीस पुनरुज्जीवित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment