मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना संघात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. जायसवाल आणि गिल व्यस्त वेळापत्रकामुळे गेल्या काही टी-२० सामन्यांमध्ये खेळले नव्हते. पण आता इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांनंतर त्यांच्याकडे १ महिन्याचा कालावधी आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांचेच लक्ष वेधले होते.त्यामुळे त्याच्या नावाचा विचारही केला जाऊ शकतो.
भारतीय क्रिकेट संघाचा आशिया कपच्या ‘अ’ गटामध्ये समावेश आहे. या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई बरोबर असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आशिया चषक स्पर्धेतील आघाडीच्या फळीतील महत्त्वाचे क्रिकेटपटू ठरू शकतात. पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची उपलब्धता हा एक मोठा मुद्दा आहे. संघ निवडीपूर्वी या दोघांनाही फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. तर साई सुदर्शनने आयपीएल २०२५ चा हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये १५६.१७ च्या स्ट्राईक रेटने ७५९ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचा विचार निवड समिती करण्याची शक्यता आहे.