नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली आहे. अनेक ठिकाणाहून पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली. आता भारत-पाकिस्तान सीमेवर आणखी एका संशयिताला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा संशयित डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या गेस्ट हाऊसचा मॅनेजर आहे.आरोपी हेर २००८ पासून डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत आहे. तो कधीपासून हेरगिरी करत होता, याचा पूर्ण खुलासा अद्याप झालेला नाही. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या गेस्ट हाऊसमध्ये लष्करी चाचण्यांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञ थांबतात. येथून हा हेर मॅनेजर पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवत होता.
या प्रकरणाचा खुलासा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. माहितीनुसार, पकडलेल्या संशयित हेराचे नाव महेंद्र प्रसाद आहे. तो उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी आहे. त्याच्या मोबाइल आणि चॅट्समधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे मिळाले असल्याचे समोर आले आहे.आरोपीने बरीच माहिती लीक केली आहे.
त्याच्यावर संशय आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी बराच काळ त्याच्यावर नजर ठेवली होती. पुरावे मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी गुप्तचर विभाग त्याची कसून चौकशी करत आहे.