
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भारी कर वाढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की ते पुढील २४ तासांत भारतावर भारी टॅरिफ लादणार आहेत. ट्रम्प यांना भारत आणि रशियामध्ये होत असलेला व्यवहार याधीपासूनच खटकत होता. त्यात भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत असल्यामुळे ते भारतावर नाराज आहेत. त्यांनी त्यांची ही नाराजी अनेकवेळा व्यक्त करत, अतिरिक्त टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. मात्र तरीही भारत आणि रशियामधील व्यवहार सुरूच असल्यामुळे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चिडल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी एका मुलाखतीत म्हंटले आहे की, 'मला वाटते की मी पुढील २४ तासांत भारतावर भारी टॅरिफ लादण्याची शक्यता आहे.
ही नवीन घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले होते की, भारत मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत आहे आणि ते विकून नफाही कमवत आहे. त्यांमुळे रशियासोबतच्या व्यापाराबाबत भारतावर टॅरिफ वाढवणार असल्याचे म्हटले होते.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संदेशात म्हटले होते की, 'भारत केवळ रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत नाही, तर या खरेदी केलेल्या तेलाचा मोठा भाग बाजारात विकून त्यावर मोठा नफा कमवत आहे. रशियाच्या युद्ध यंत्रणेमुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत याची भारताला पर्वा नाही. म्हणून, मी भारतावर भारी कर वाढवणार आहे.'
ट्रम्पच्या धमकीवर भारताने काय म्हटले?
भारताने ट्रम्पच्या धमकीला 'अवास्तव आणि अतार्किक' म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ट्रम्पच्या वक्तव्यावर टीका केली. मंत्रालयाने म्हटले आहे की एकीकडे अमेरिका रशियासोबत व्यवसाय करत असताना, दुसरीकडे ते भारत-रशिया व्यापारावर बोट दाखवत आहे. गेल्या वर्षी, कठोर निर्बंध आणि शुल्क असूनही, अमेरिकेने रशियासोबत सुमारे $3.5 अब्जचा व्यापार केला. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या दुटप्पी वृत्तीवर म्हटले आहे की, 'अमेरिका अजूनही आपल्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने रशियाकडून आयात करते.' परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.'
भारत रशियन तेलाच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक
भारत सध्या रशियन तेलाच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर, अनेक युरोपीय देशांनी रशियासोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात कमी केला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यानंतर, भारत आणि चीन सारख्या आशियाई देशांनी मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी केले. रशिया काही वेळातच भारताचा प्रमुख तेल पुरवठादार बनला आणि भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. यावरील सुरुवातीच्या दबावानंतर, अमेरिका शांत झाली होती परंतु आता ट्रम्प प्रशासनाने पुन्हा भारतावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. मात्र, भारताने स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही दबावाखाली येणार नाही. दरम्यान, रशियानेही भारताच्या बचावासाठी धाव घेतली आहे आणि म्हटले आहे की प्रत्येक देशाला आपला व्यापार भागीदार निवडण्याचा अधिकार आहे, अमेरिका देशांवर दबाव आणू शकत नाही.
ट्रम्पच्या धमकीवर रशियाने काय म्हटले?
मंगळवारी माध्यमांशी बोलताना, रशियन राष्ट्रपती राजवाडा क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, 'आम्हाला अशी अनेक विधाने ऐकायला मिळतात जी स्पष्टपणे सांगायचे तर धमक्या आहेत. या धमक्यांद्वारे विविध देशांना रशियाशी व्यापार संबंध संपुष्टात आणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही अशा विधानांकडे लक्ष देत नाही.' पेस्कोव्ह पुढे म्हणाले, 'आम्हाला वाटते की सार्वभौम देशांना त्यांचे व्यापार भागीदार, व्यापार आणि आर्थिक सहकार्यासाठी भागीदार निवडण्याचा अधिकार असावा आणि त्यांच्याकडे तो आहे.'