गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या व परतीचा प्रवास करणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणचे खासदार नारायण राणे यांनी नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या प्रश्नांसंबंधी सविस्तर चर्चा केली. खा. नारायण राणे यांनी कोकणातील आणि मुंबईतील रेल्वेच्या अनेक समस्या प्रश्नांची मांडणी केली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून लाखो मुंबईकर चाकरमानी कोकणातील आपआपल्या गावी जातात. गणपती उत्सवात गावाकडे रमतात आणि नोकरी, व्यवसायासाठी पुन्हा मुंबईत माघारी फिरतात. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांपेक्षा अधिक असते. या गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर जादाच्या रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात जेणेकरून कोकणात या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवासी जनतेचा रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी जादाच्या रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी खा. नारायण राणे यांनी केली आहे. कोकणातील जनतेसाठी गणेशोत्सवाचे महत्त्व किती व कसे आहे. एकाचवेळी रेल्वे गाड्या जादा प्रमाणात सोडण्यात येत असताना रेल्वे गाड्यांचे शेड्युल बिघडणार नाही तशा सूचना देण्यात याव्यात असेही खा. नारायण राणे यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्याचबरोबर कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासंबंधीही खा. नारायण राणे यांच्याशी चर्चा केली यामुळे यावर्षीचा गणेशोत्सवकाळातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा करावयास काहीच हरकत नाही.
कोकणाला मुख्यमंत्री सहाय्यताचा आधार
कोणत्याही व्यक्तीला एखादा आजार झाला की त्याला त्याच्या आजारपणाचा भार पेलत नाही. ज्यांच्याकडे पैसा संचय केलेला असतो ती व्यक्ती आपल्या कुटुंबावर अचानक आलेल्या कोणत्याही प्रसंगातून निभावून नेते; परंतु शेवटी एकीकडे तो गंभीर आजार असेल, तर त्याच्या आजारपणात येणारा लाखो रुपयांचा खर्च त्या कुटुंबासाठी करणे फारच अवघड होऊन जात. अशा आजारपणाच्या प्रसंगात नातेवाइकांच्या मदतीलाही फारच मर्यादा येतात आणि मग ज्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असते असं कुटुंब आर्थिक ओढाताणीने बेजार झालेले असते; परंतु अशा कित्येक प्रसंगात गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गंभीर आजारी रुग्णाला मदत केली जाते. त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने एक आधार मिळतो. कमी उत्पन्न असणाऱ्यांना या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळत असते. कॉक्लियर इम्लांट,(वय २ वर्षे ते ६ वर्षे) हृदय, यकृत, किडनी, फुप्फुस, बोनमॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसीस, कर्करोग,(केमोथेरपी/रेडिएशन)अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न(भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण, अशा २० प्रकारच्या गंभीर आजारांसाठी या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य दिले जाते. सध्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा फार मोठा आधार झाला आहे. कोकणमधील २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांची मदत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पावणेतीन हजार गरीब रुग्णांपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या अशा योजनांच्या माध्यमातून गरीब रुग्ण लाभ घेतोच; परंतु जेव्हा त्यातही काही समस्या उद्भवली तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार मिळू शकतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील गरीब, गरजू व आर्थिक दुर्बल असणाऱ्या या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खऱ्याअर्थाने मोठा आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पेपरलेस कामकाज होत असल्याने गरीब गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना होणारा मनस्ताप कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांच्या स्थापनेमुळे खऱ्याअर्थाने गरीब, गरजू रुग्णांना मदत वेळेत मिळत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तातडीने मिळणाऱ्या मदतीने गरीब गरजू रुग्णांच्या आयुष्याला, जगण्याला बळ देण्याचं काम या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या कामकाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: यात लक्ष घालत आहेत.
बिबटे, गवे लोकवस्तीत
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये बिबटे, गवा, रेडे यांचा कमालीचा त्रास वाढला आहे. दर दोन-पाच दिवसांत कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पूर्वी जंगलामध्ये राहणारे बिबटे आता लोकवस्तीत राजरोसपणे फिरू लागले आहेत. बिबटे विहिरीत पडायचे प्रमाणही फारच वाढले आहे. खरे तर वन्यप्राण्यांच्या लोकवस्तीमधील मुक्तसंचाराने सर्वसामान्य माणूस भीतीच्या छत्रछायेत वावरत आहे. गवा, रेड्यांचा कळप कोकणतील हमरस्त्यावरून आरामात ये-जा करतो. पूर्वी जंगलात दिसणारे हे वन्य प्राणी आता कुठेही, कधीही दिसतात. बिबटे आणि गवारेडे मानवी वस्तीत येऊन बिनधास्त लोकांवर हल्ले करत असतात. बागायत, भातशेतीचेही गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. कोकणातील वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या या त्रासामुळे शेतकऱ्यांनी फळबागायती, भातशेती करायची की नाही असा प्रश्न कोकणातील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. गोवा राज्याच्या सीमेलगतच्या दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा त्रास कमी होत नाही. हत्तींना आवरण्यासाठी सरकारने एलीफंटा गो बॅकसारखा प्रयत्नही करून पाहिला; परंतु त्यातही फारसं यश येऊ शकलं ही. शासनाकडून मिळणार नुकसानभरपाई फारच तुटपुंजी असते. बर या मिळणाऱ्या नुकसानभरपाईने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकणारी नसते; परंतु शेतकऱ्यांकडे दुसरा मार्गही नसतो. संताप व्यक्त करणे आणि हतबल होऊन जे होतय ते पाहत राहणे. वन्यप्राण्यांमुळे एकतर शेतकऱ्यांना स्वत:चा जीव वाचवायचा की शेती, बागायतीचा सांभाळ करायचा. ही तारेवरची कसरत कोकणातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना रोजचीच झाली आहे. आजवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक सामान्य गरीब शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. यामुळे शेतकरी टांगती तलवार घेऊन रोजच जगणं-मरणं अनुभवत आहे.
- संतोष वायंगणकर