मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अखेर मागे घेतला असला तरी मंडळांनी खड्डे विरहित मंडप उभारावे ही अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना खड्डे विरहित मंडपांसाठी नवीन तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. रस्त्यावर खट्टे न खणता कसे मंडप बंधावे यासाठी महापालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाने उपायही सुचवले आहेत. त्यात रेतीने भरलेल्या पिंपात खांब उभारण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
रस्त्यावर खड्डे खणून त्यात बांबू रोवून त्यापासून मंडप घालण्याची पद्धत आता कालबाह्य ठरणार आहे. यावर्षीपासून मंडळांनी खड्डे विरहित मंडप उभारावे, अशी अट मुंबई महापालिकेने घातली आहे. मंडप घालण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास प्रति खड्डा पंधरा हजार रुपये दंडही करण्याच्चा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. मात्र राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना हा वाढीव दंड रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच प्रति खट्टा दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
तसेच मात्र दंडाची रक्कम कमी केली असली तरी मंडप खड्डे विरहितच उभारावे यावर मुंबई महापालिका प्रशासन ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाज माध्यमांवरून मंडळांना तशाच सूचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाच्या उपायुक्तांनी याबाबत एक परिपत्रक काढले असून त्यात खट्टे विरहित मंडप कसे उभारावे माचे उपाय सुचवले आहेत.
हे तंत्र सर्व मंडळांनी वापरावे असेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील गणेशमूर्ती उंच असल्यामुळे उंच मंडप उभारावे लागतात. त्यामुळे अशा ठिकाणी खड्डे विरहित मंडप उभे राहू शकतील का असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई काही मंडळे पूर्वीपासून या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरत असले तरी ते महाग असल्यामुळे छोट्या मंडळांवरचा मंडपाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.