
बोगस डॉक्टरांना बसणार आळा
पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) कंबर कसली असून सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी 'क्यूआर कोड' प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. 'नो युअर डॉक्टर' या उपक्रमांतर्गत ही प्रणाली लागू केली जाणार असून, यामुळे नागरिकांना डॉक्टरांची नोंदणी, पात्रता, आणि परवाना याची सविस्तर माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा बसेल, असा 'एमएमसी'ला विश्वास आहे.
गेल्या पाच वर्षांत ३९१ बोगस डॉक्टरांविरुद्ध राज्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती विधानसभेतील चर्चेत उघड झाली होती. त्यानंतर ही कारवाई तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ३९१ प्रकरणांपैकी केवळ दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. तर १७ प्रकरणांमध्येच आरोप सिद्ध झाले आहेत.
यामुळे फसवणूक रोखण्यासाठी क्यूआर कोडसारख्या पारदर्शक प्रणालीची गरज निर्माण झाली असल्याची माहिती 'एमएमसी'ने दिली. या निर्णयाचे स्वागत इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे यांनी केले आहे. त्यांनी ही प्रणाली अत्यावश्यक होती. यामुळे बनावट डॉक्टरांवर नियंत्रण आणि नागरिकांचा प्रामाणिक डॉक्टरांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे स्पष्ट केले.