Monday, August 4, 2025

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं
लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं टीम इंडियाला तारलं. भारत सामना सहा धावांनी जिंकला. या विजयामुळे भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.

अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ३९६ धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २४७ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ३६७ धावा केल्या. भारताला पहिल्या डावात करुण नायर आणि साई सुदर्शन यांच्यामुळे तर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल, आकाशदीप, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल यांच्यामुळे इंग्लंडपुढे आव्हान उभे करणे जमले. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या डावात इंग्लंडच्या हॅरी ब्रूक आणि जो रूट तसेच बेन डकेट यांनी भारताच्या तोंडाला फेस आणला होता. पण इंग्लंडचे तळाचे फलंदाज लवकर बाद झाले आणि भारताने सामना सहा धावांनी जिंकला.

मोहम्मद सिराज चमकला

मोहम्मद सिराजने शेवटच्या कसोटीत इंग्लंडचे पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच असे एकूण नऊ बळी घेतले. संपूर्ण मालिकेत त्याने १४ बळी घेतले. मोहम्मद सिराजच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. सिराजने अखेरच्या डावात इंग्लंडच्या झॅक क्रॉली (१४ धावा), ऑली पोप (२७ धावा), जेमी स्मिथ (२ धावा), जेमी ओव्हरटन (९ धावा) आणि अ‍ॅटकिन्सन (१७ धावा) या पाच जणांना बाद केले. इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवून सिराजने भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला.

संक्षिप्त धावसंख्या : भारत २२४ (करुण नायर ५७; गुस ॲटकिन्सन ५-३३, जोश टंग ३-५७) आणि ३९६ (यशस्वी जैस्वाल ११८, आकाश दीप ६६, वॉशिंग्टन सुंदर ५३, रवींद्र जडेजा ५३; जोश टंग, इंग्लंड ५-१२५-१२) २४७ (झॅक क्रॉली ६४, हॅरी ब्रूक ५३; प्रसिध कृष्णा ४-६२, मोहम्मद सिराज ४-८६) आणि ३६७ (हॅरी ब्रूक १११, जो रूट १०५; मोहम्मद सिराज ५-१०४, प्रसिध्द कृष्णा ४-१२६) भारत ६ धावांनी विजयी.



भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका - निकाल

पहिली कसोटी - लीड्स - हेडिंग्ले - इंग्लंडचा पाच गडी राखून विजय
दुसरी कसोटी - बर्मिंगहॅम - एजबॅस्टन - भारत ३३६ धावांनी जिंकला
तिसरी कसोटी - लॉर्ड्स - लंडन - इंग्लंड २२ धावांनी विजयी
चौथी कसोटी - एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड - मँचेस्टर - अनिर्णित
पाचवी कसोटी - केनिंग्टन ओव्हल - लंडन - भारत सहा धावांनी विजयी
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >