उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?


भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पत्रकार परिषदेत सवाल


मुंबई : राजकारणात पुन्हा एकदा हिंदुत्वाचं राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांवरून आता भाजपने थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. "हिंदुत्वाचा मुखवटा घालणारे ठाकरे, आव्हाडांच्या हिंदूविरोधी वक्तव्यांशी सहमत आहेत का?" असा थेट सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.


"भगवा दहशतवाद" हा फेक नॅरेटिव्ह न्यायालयानेच फेटाळून लावल्यावर, काँग्रेस आणि शरद पवार गट आता 'सनातनी दहशतवाद' अशी नवी कथा रचत आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मालेगाव स्फोट प्रकरणातील निर्दोष हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची उदाहरणं देत, हा एक सुसूत्र कट असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.


उपाध्ये म्हणाले, "सनातन धर्म ही भारताच्या सहिष्णुतेची जिवंत ओळख आहे. खुद्द महात्मा गांधींनीही 'मी सनातनी हिंदू आहे' असं १९२१ मध्ये जाहीर केलं होतं. आता मात्र काँग्रेस आणि त्यांच्या ताटाखालचं मांजर बनलेले ठाकरे हीच परंपरा पुसून टाकण्याच्या तयारीत आहेत."



या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे शांत का? ते आव्हाडांच्या विधानांना समर्थन देतात का? असा सवाल उपस्थित करून उपाध्ये म्हणाले, "हिंदुत्वाच्या नावावर मते मागणारे ठाकरे आता काँग्रेसच्या हिंदूविरोधी अजेंडाला पाठिंबा देत आहेत का?"


दरम्यान, एका दुसऱ्या मुद्यावर बोलताना उपाध्ये यांनी रोहित पवारांवर झुंडशाहीचा आरोप केला. कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा इशारा देत त्यांनी शरद पवार यांना थेट विचारलं की, "तुम्हाला ही झुंडशाही चालते का?"



काय म्हणाले केशव उपाध्ये?


भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. हिंदूंना बदनाम करण्याच्या आ. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे सहमत आहेत का असा सवाल ही उपाध्ये यांनी यावेळी केला.


मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दोषी ठरवून भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा काँग्रेस नेत्यांचा व शरद पवार यांचा कट न्यायालयाने उधळून लावल्याने आता आमदार जितेंद्र आव्हाड नावाच्या आमदारास पुढे करून सनातनी दहशतवादाचा नवा फेक नॅरेटिव्ह पुढे आणण्याचा काँग्रेस व शरद पवार गटाचा कट आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला. मात्र, सनातन धर्म ही भारताच्या प्राचीन सहिष्णु समाजव्यवस्थेची परंपरा आहे व महात्मा गांधींनीही या परंपरेचे पालन करून सनातन धर्माचे आचरण केले होते, याचा काँग्रेसच्या लांगूलचालनवादी राजकारणास विसर पडला आहे, असे ते म्हणाले. सनातन ही देशाची संस्कृती आहे, आणि या संस्कृतीने भारताच्या समाजव्यवस्थेला सहिष्णुतेचे संस्कार दिले आहेत, असे सांगून उपाध्ये यांनी ऑक्टोबर 1921 रोजी यंग इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या महात्मा गांधींच्या लेखाचा पुरावाच पत्रकारासंमोर सादर केला. मी स्वतःस सनातनी हिंदू मानतो व वेद, उपनिषदे, पुराण आणि संपूर्ण हिंदू शास्त्रांवर माझा दृढ विश्वास आहे, असे गांधीजींनी या लेखात नमूद केले आहे, असे उपाध्ये म्हणाले.


ऊठसूठ हिंदुत्वाचा बेगडी मुखवटा जनतेसमोर दाखवून हिंदुत्वाचा अभिमान असल्याचा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता आव्हाड यांच्यासमोरही गुडघे टेकले असून काँग्रेसी संस्कृतीस शरण गेलेले ठाकरे आता मूग गिळून गप्प का, आव्हाडांची सनातन संस्कृतीवरील टीका त्यांना मान्य आहे का, असा सवालही उपाध्ये यांनी केला. सनातन संस्कृतीच्या विरोधात गरळ ओकून अल्पसंख्याकांच्या भावना कुरवाळण्याचे काँग्रेस व शरद पवार गटाचे राजकारण सपशेल फसले असताना पुन्हा एकदा हिंदुविरोधाची मळमळ आव्हाडांच्या मुखातून ओकून टाकण्याचा काँग्रेसी संस्कृतीचा आणि त्यास शरण गेलेल्या उद्धव ठाकरे यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही उपाध्ये म्हणाले.



रोहित पवार यांची झुंडशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक


कोणतेही पुरावे न देता एका घटनेसंदर्भात पोलिसांवर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरत शरद पवार गटाच्या आ. रोहित पवार यांनी पोलीस आयुक्तालयात झुंडशाही करत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांची ही झुंडशाही लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ही झुंडशाही मान्य आहे का, असा सवाल ही उपाध्ये यांनी केला.


दरम्यान, या साऱ्या घडामोडींनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्व, सनातन धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ तापवली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला अधिक धार लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंब्रा,कुर्ल्यात ATS छापे; 'अल्-कायदा' लिंकचा संशय!

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संशयित मूलतत्त्ववादी गतिविधींच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी मुंब्रा

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर

कुर्ल्यातील हॉटेलमध्ये भीषण आग

मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली.

लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार - मंत्री आशिष शेलार

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या "इंडिया हाऊस"ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास

Central Railway : लोकलची 'लेटलतिफी' आता बंद! मध्य रेल्वेवर लवकरच लोकल 'सुसाट' धावणार, जबरदस्त प्लॅन नेमका काय?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ मुंबई (सचिन धानजी)  मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर