Sunday, August 24, 2025

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य

कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पाऊले टाकत आहे. मात्र आपण महासत्ता होऊ नये यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा कट रचला जात आहे.

मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा'' असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे माजी संचालक आयआरएस समीर वानखेडे यांनी कल्याण येथे केले. येथील माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच ॲड. शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मिशन नशामुक्त' कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार, यंग इंडिया कल्याणच्या ॲड. शिवानी कांबळे, श्री सदस्य यतीन चाफेकर, के. सी. गांधी शाळेचे ट्रस्टी मनोहर पालन यांच्यासह कल्याणातील ज्येष्ठ मंडळी, शालेय - महाविद्यालयीन शिक्षक आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

''कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक, मानसिक नुकसान होत नाही. तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत.

आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २० टक्के जनता ही तरुण आहे. केवळ तरुणच नाहीये तर या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्र्वासही आहे. त्यामुळेच तर काही परकीय शक्तींनी या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अंमली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडे यांनी यावेळी केला.

Comments
Add Comment