जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर


वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याची कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्याचीच ही अधिक भीती निर्माण झाली आहे.


पालघर जिल्ह्याची सागरी, डोंगरी, आणि नागरी अशी विभागणी झालेली असली तरी कृषी क्षेत्रात विविध उत्पादने घेणारा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो; परंतु जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्यातील कृषी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक झालेल्या दुर्लक्षामुळे कृषिप्रधान जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


पालघर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर भातशेती केली जाते. बहुसंख्य भागात भाताची विविध वाण लावून येथील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहे. बाजारपेठेत वाडा कोलम आणि झिनीच्या तांदळाला मोठी मागणी आहे; परंतु लहरी हवामान, अवेळी पडणारा पाऊस, परतीच्या पावसामुळे भातशेतीचे होणारे नुकसान, शासनाची उदासीनता यामुळे वाडा कोलम, आणि झिनीचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे.


त्यातच वाडा कोलम आणि झिनीच्या नावाने बनावट तांदूळ बाजारपेठेत विकला जाऊ लागल्याने मूळ उत्पादन घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्याची ओळख असलेल्या या पिकांचे उत्पादन वाढावे, त्याचे संवर्धन व्हावे म्हणून शासन कोणतेही प्रयत्न करत नसल्याने भातशेतीचे कोठार असलेली ओळख आता हरवत चाललेली आहे.


तर डहाणू तालुक्यातील ‘चिकू’ हा जगप्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यातील घोलवडाच्या चिकूला देशभरात मान्यता आहे; परंतु लहरी हवामान, वाढते प्रदूषण यामुळे चिकू उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. चिकूमुळे पालघर जिल्ह्याला वेगळी ओळख मिळाली आहे; परंतु चिकू प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावेत म्हणून जिल्हा निर्मितीनंतर काही प्रयत्न होतील अशी अपेक्षा होती.


परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शासकीय स्तरावरून कोणतेही प्रक्रिया उद्योग उभे राहिले नाहीत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर चिकूचे उत्पादन घेतले जात असतानाही हक्काची बाजारपेठ, निर्यात या धोरणावर जिल्हा निर्मितीनंतर काहीही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे संधी असूनही डहाणूतील चिकूला देशाच्या आणि जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.


तर जव्हार, मोखाडा तालुक्यात नागली आणि वरईचे पिक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. मात्र अवेळी पडणाऱ्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या नागली वरईची शेती ही लहरी निसर्गावरच अवलंबून आहे. कधी अवेळी पडणारा पाऊस तर कधी पावसाने ओढ दिल्याने डोंगरी भागावर लागवड केलेली नागली – वरईची उभी पिके मरून गेल्याचे अनेकदा घडले आहे.


नागली आणि वरईला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. वरईपासून बनविल्या जणाऱ्या भगरीला गुजरातसह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. मात्र त्याकरिता खासगी व्यापाऱ्यांवर येथील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते.


एकंदरीत पालघर जिल्ह्याला शेती व्यवसायातील विविध उत्पादनामुळे एक वेगळी ओळख निर्माण झालेली असली तरी, जिल्ह्यातून अनेक नद्या वाहत असूनही सिंचनाच्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना केवळ हंगामी शेतीवर अवलंबून राहावे लागत आहे. सिंचनक्षेत्र वाढावे म्हणून प्रयत्न होताना दिसत नाहीत.

Comments
Add Comment

एकाच वेळी संसदेत मांडली तीन विधेयक

खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके

न्याय मागणाऱ्या महिलेवर पोलिसाकडूनच अत्याचार

आरोपी हवालदारास अटक डहाणू : आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेशी जवळीक साधून तिच्यावर

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये