लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा ड्रामा पाहायला मिळाला. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली, ज्यामुळे मैदानातील वातावरण काही काळ तापले होते.
नेमकी घटना काय घडली?
ही घटना इंग्लंडच्या २२ व्या षटकात घडली. प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीला बाद केल्यानंतर जो रूट फलंदाजीला आला. षटकातील पाचव्या चेंडूवर जेव्हा रूटने बचावात्मक शॉट खेळला, तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर, त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रूटने चौकार मारला, ज्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही आपला संयम गमावून बसले आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
अंपायर्सना हस्तक्षेप करावा लागला
मैदानातील परिस्थिती हाताळण्यासाठी अंपायर्सना हस्तक्षेप करावा लागला. तसेच, भारतीय संघातील काही खेळाडूंनीही मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली. या घटनेनंतर पुढच्याच षटकात जो रूट अंपायर्सशी बोलताना दिसला, तो आपली बाजू मांडत असावा असे वाटत होते. २२ व्या षटकात जे घडले, त्यामुळे दोन्ही संघ नाखुश असल्याचे वृत्त आहे.