
बंगळुरु : भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांचा नातू आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला एका घरकाम करणाऱ्या महिलेशी बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. या खटल्यात उद्या (२ ऑगस्ट) शिक्षेची घोषणा होणार आहे. कोर्टात निकाल ऐकून रेवन्ना रडू लागला आणि अश्रूंना आवर घालू शकला नाही.
कोर्टात पीडितेने सादर केलेली तिची ‘साडी’ ठरली केसची वळण बदलणारी ठिणगी!
फॉरेन्सिक तपासात त्या साडीवर स्पर्मचे अवशेष सापडले आणि तोच पुरावा अखेर न्यायालयाला पटला.
या प्रकरणाने एप्रिल २०२४ मध्ये खळबळ उडवली होती, जेव्हा म्हैसूरमधील केआर नगर येथील फार्महाऊसवर काम करणाऱ्या महिलेनं रेवन्नावर २०२१ पासून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तसंच तिने सांगितले की, काही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी रेवन्ना देत असे. याच धमकीच्या पुराव्यातून व्हिडिओ क्लिपही SITने जप्त केली.
१४ महिन्यांतच न्यायालयीन निकाल देण्यात आला. विशेष म्हणजे, सीआयडीच्या SIT पथकाने केलेल्या तपासात तब्बल १२३ पुरावे आणि २३ साक्षीदारांची साक्ष कोर्टात सादर करण्यात आली. एकूण २,००० पानी आरोपपत्र दाखल झालं.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी दिलेल्या निकालात रेवन्नावर बलात्कार, गोपनीयता भंग, धमकी देणे आणि अश्लील व्हिडिओ लीक करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली दोष निश्चित केला आहे.
या घटनेने केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातही मोठी खळबळ निर्माण केली आहे. आता उद्या शिक्षा काय ठरणार? आजन्म कारावास की कठोर शिक्षा? देशभरात याकडे लक्ष लागले आहे.