मुंबई: मालेगावात २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एएनआयए न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर आता जोरदार टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी काँग्रेसवर टीका केली असून, मतांच्या राजकारणासाठी “हिंदू टेरर” आणि “भगवा दहशतवाद” या शब्दांचा वापर करत, काँग्रेसने हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हंटले की, "तुम्हाला माहित असेल की, संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा इस्लामिक दहशतवाद चर्चेत होता. यामुळे आम्हाला जे मत देणारे लोक आहेत, त्यांचा रोष ओढवू नये म्हणून हिंदू दहशतवाद ही थेअरी त्यावेळच्या सरकारने निर्माण केली. लोकांना अटक करण्यात आली. हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे हे षड्यंत्र होते. पण अनेक प्रयत्न करूनही त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळू शकले नाहीत. काही स्वयंसेवक असे होते की, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता. ते पुढे असे देखील म्हणाले की, “इस्लामिक दहशतवाद त्यावेळीही होता आणि आजही आहे. पण असे कोणी म्हटलेले नाही की, सर्व मुस्लिम दहशतवादी आहेत. तरीही हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला होता.”
#WATCH | Nagpur: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis says, "The conspiracy of 2008 has been exposed before everyone. The government at that time, for the sake of vote-bank politics, coined terms like 'Hindu terror' and 'saffron terrorism.' At that time, large-scale… pic.twitter.com/DVZ5lxO36E
— ANI (@ANI) August 1, 2025
“काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे.”
उद्धव ठाकरे यांना टोला
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा बॉम्बस्फोट कोणी केला? हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला? हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत. त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे. भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं. पण आता तेही लांगून चालन करण्याच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे ते असं अभिनंदन करणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.