मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. या तणावपूर्ण वातावरणात रशियाने युक्रेनच्या चेर्निहिव्ह प्रदेशातील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात २०० युक्रेनियन सैनिक ठार झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या १६९ व्या प्रशिक्षण केंद्राला दोन इस्कंदर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले होते, त्यापैकी एक अनेक लहान बॉम्बने भरलेले क्षेपणास्त्र होते तर दुसरे उच्च दर्जाच्या स्फोटकांनी भरलेले क्षेपणास्त्र होते.
युक्रेनने रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रशियाने ७८ ड्रोन हल्ले केले, त्यापैकी काही नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज जेट-चालित ड्रोन होते. या हल्ल्यांमध्ये किमान ५ नागरिक जखमी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारानुसार २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत रशियन हल्ल्यांमुळे ६,७५४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या २०२४ च्या तुलनेत ५४ टक्के जास्त आहे. रशियाने २०२२ पासून आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांमध्ये १३ हजार ५८० युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये ७१६ मुले आहेत.
दरम्यान, रशियाने युक्रेनसोबत चर्चा करुन आठ ऑगस्ट पर्यंत युद्धबंदी जाहीर करावी. नाहीतर अमेरिका रशियावरील आयात शुल्कांमध्ये (टॅरिफ) वाढ करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. युक्रेनचा जास्तीत जास्त भूभाग ताब्यात घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून शांतता चर्चेत वेळ वाया घालण्याचा उद्योग सुरू आहे. युद्धबंदी करणे रशिया टाळत आहेत, असा आरोप अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन करत आहे.
युक्रेनकडे १० लाख सैनिक आहेत. पण अनेक सैनिक युद्धात सहभागी व्हायचे नाही म्हणून मोबाईल बंद करुन वरिष्ठांना न सांगताच अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत. ते कामावर परतले नाहीत. रशिया मागील काही दिवसांपासून सातत्याने युक्रेनच्या लष्करी तळांना तसेच त्यांच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करुन हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या लढण्यासाठी सक्षम असलेल्या सैनिकांमध्ये आणखी घट झाली आहे.