नवी दिल्ली: संसदेत सोमवारपासून (ता. २८ जुलै) पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा सुरू आहे, त्या चर्चेत सहभागी झालेल्या सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून तर देशभक्तीचे वाटते. पण सरकारने माध्यमांमध्ये केलेला तो एक तमाशा होता,’ असे विधान केले होते. या विधानावरून सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. या घमासान नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात प्रणिती शिंदेसह काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' असं संबोधलं आणि केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. 'ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा केवळ मीडियासाठी तमाशा होता. यात किती दहशतवादी मारले गेले? किती लढाऊ विमाने गमावली? कोण जबाबदार आहे? याचं उत्तर सरकारनं द्यावं.' अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली.
पंतप्रधान नरेंद मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हंटले, "काँग्रेसच्या एक नवख्या खासदार (प्राणिती शिंदे)... त्यांना आपण माफ केलं पाहिजे; कारण नवख्या खासदारास काय म्हणायचे? पण काँग्रेसचे आका त्यांना लिहून देतात, त्यांच्याकडून वदवून घेतात. कारण, काँग्रेसच्या आकामध्ये हिम्मत नाही."
नवख्या सदस्यांकडून काँग्रेसचे आका वदवून घेतात की, ऑपेरशन सिंदूर हा तर तमाशा होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या २६ लोकांना मारलं, त्या भयंकर घटनेवर ॲसिड टाकण्यासारखे हे पाप आहे. या ऑपरेशनला तुम्ही तमाशा म्हणता? तुमची असहमती असू शकते. पण, काँग्रेस पक्षाचे लोक असं वदवून घेतात, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला.