एजबॅस्टन: भारतीय चॅम्पियन्सनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) च्या उपांत्य फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. हा सामना गुरुवारी होणार होता. भारतीय संघाचे म्हणणे आहे की, त्यांना पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारचा सामना खेळायचा नाही.
भारतीय चॅम्पियन्सने मंगळवारी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सना फक्त १३.२ षटकांत हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत आधीच आक्षेप घेतला होता. यापूर्वीही, खेळाडू आणि स्पर्धेच्या एका प्रमुख प्रायोजकाने विरोध केल्याने गट टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या EaseMyTrip नावाच्या कंपनीनेही सेमीफायनल सामन्यापासून स्वतःला दूर ठेवले. कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की, भारतीय लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही या सामन्यातून माघार घेत आहोत. त्यांच्या मते, "दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत."
माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांनीही पाकिस्तानविरुद्ध मॅच न खेळण्याचा पवित्रा घेतला आहे. या स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यांना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानविरुद्धचा गट सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारत उपांत्य फेरीत पोहोचला.
या स्पर्धेच्या गट टप्प्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध यापूर्वीही एक सामना खेळलेला नाही. कारण पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचा सामना न खेळण्याचे धोरण भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी अवलंबले. ज्यामुळे अनेक खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात शिखर धवन, हरभजन सिंग आणि युसूफ पठाण या महत्वाच्या खेळाडूंचा देखील समावेश होता. त्यांचे हे बहिष्कार सत्र आताही कायम असून, उपांत्य असो वा अंतिम सामना असो, पाकिस्तान विरुद्ध अजिबात खेळणार नसल्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. धवनने सोशल मीडियावर एक जुना ईमेल शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने WCL आयोजकांना आधीच कळवले होते की भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे तो पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना खेळणार नाही.