इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहराला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला हा पूल सध्या वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
हा पूल सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध चालताना तोल जाऊन पडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका आणखी वाढला आहे. अनेक विद्यार्थी शाळेत जाताना खड्ड्यांमधून उडणाऱ्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे घसरत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, तर काही वेळा वाहने या खोल खड्ड्यांमध्ये अडकून पडतात. विशेषतः रात्रीच्या वेळेस अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
पावसाळ्यात येणारे पर्यटक आणि विपश्यना साधनेसाठी येणारे साधक यांच्या वाहनांच्या गर्दीत, तसेच तालुक्यातील दळणवळण वाहतुकीच्या कोंडीत अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. ग्रामीण रुग्णालयात जाणारे रुग्ण, रुग्णवाहिकेतील गंभीर रुग्ण, गरोदर माता आणि अपघाती रुग्णांना या खड्ड्यांमुळे असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांचा संताप
या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तात्पुरती खडी टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पावसामुळे ती खडी वाहून जाते आणि खड्ड्यांची जागा आणखी मोठी होते, ज्यामुळे समस्या अधिकच गंभीर होते.
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तीव्र चिंता व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा ताळमेळ सुटून अपघात होतात, तसेच शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चालत जातानाही धोका वाटतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित पुलाची डागडुजी करून खड्डे बुजवण्याची आणि पुलाच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.