लंडन : इंग्लंडचा संघ ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सशिवाय खेळणार आहे. बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. स्टोक्सऐवजी ऑली पोपकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोपने भारताविरुद्ध लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले होते. मँचेस्टर कसोटीत त्याने इंग्लंडसाठी ७१ धावांची खेळी केली होती. मँचेस्टरमधील अनिर्णित सामन्यानंतर
इंग्लंडने आपल्या संघात एकूण चार बदल केले आहेत.ज्यात जेकब बेथेल, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन आणि जोश टोंग यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्से यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर लियाम डॉसनला पूर्णपणे वगळण्यात आले आहे. बेथेल आणि जो रूट हे दोन फिरकी गोलंदाजीचे पर्याय इंग्लंडकडे आहेत.तर क्रिस वोक्सला अननुभवी वेगवान गोलंदाजींच्या आक्रमणाचे नेतृत्व करण्यासाठी कायम ठेवण्यात आले आहे.
बेन स्टोक्सची अनुपस्थिती इंग्लंडसाठी एक मोठा धक्का आहे. स्टोक्स मालिकेत सर्वाधिक १७ बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने मँचेस्टरमध्ये दोन वर्षांत पहिले कसोटी शतक झळकावले आणि गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. गेल्या वर्षी दोन वेळा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे स्टोक्ससाठी हा आणखी एक निराशाजनक धक्का आहे आणि अॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडच्या समोर हा चिंतेचा विषय आहे.