Saturday, August 2, 2025

Russia Earthquake: भूकंपानंतर त्सूनामी, रशिया ते जपान सगळीकडे हाहाकार; किनाऱ्यावर आले मोठे मासे; नागरिक छतावर चढले

Russia Earthquake: भूकंपानंतर त्सूनामी, रशिया ते जपान सगळीकडे हाहाकार; किनाऱ्यावर आले मोठे मासे; नागरिक छतावर चढले

मॉस्को: रशियात ८.८ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. यानंतर पॅसिफिक महासागरात उंचच उंच लाटा उसळल्या. या लाटांनी रशियापासून जपानपर्यंत सगळीकडे विनाश झाला. बुधवारी सकाळी रशियाच्या पूर्वेकडील कामचटकाला मोठा भूकंप झाला. हा दशकातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. आतापर्यंतचा हा सहावा सर्वात तीव्र भूकंप असल्याचे अमेरिकेतील भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले. भूकंपानंतर थोड्याच वेळात ३० सेंटीमीटर उंचीची पहिली पहिली त्सूनामी लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरो येथे धडकली.


पॅसिफिक त्सूनामी इशारा केंद्राने हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटांच्या काही किनारी भागात एक ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची भीती व्यक्त केली. रशिया आणि इक्वेडोरच्या काही किनारी भागात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्सूनामीच्या लाटांनी प्रथम कामचटकाला धडक दिली. त्यामुळे सेवेरो-कुरिल शहरातील बंदर आणि मासे प्रक्रिया प्रकल्प पाण्याखाली गेले. रशियातील एका बालवाडीच्या इमारतीचे नुकसान झाले. अनेक इमारतींच्या आवारात पाणी आले पण इमारती सुरक्षित आहेत. यामुळे आतापर्यंतच्या लाटांमुळे जीवितहानी झाल्याची माहिती रशियातून आलेली नाही.


विनाशकारी भूकंपानंतर जपानच्या किनाऱ्यावर ४ व्हेल आल्या. त्सूनामीचा इशारा जारी झाल्यानंतर जपानमधील होक्काइडोमधील लोक छतावर चढले. अमेरिका आणि फिलीपिन्सच्या किनारी भागातही त्सूनामीचा इशारा देण्यात आला. रशियात उत्तर कुरिल जिल्ह्यात जिथे त्सूनामी आणि भूकंपाचे धक्के बसले आहेत, तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्सूनामीच्या लाटा ४ मीटर उंच होत्या त्यामुळे अनेक भागातून विनाशाचे वृत्त येत आहे. रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की येथे असंख्य नागरिक नेसत्या वस्त्रांनिशी घरांच्या छतावर चढले. अनेकांनी उंच जागी आश्रय घेऊन स्वतःचा जीव वाचवला.


अलास्का अल्युशियन बेटांच्या काही भागांसाठी त्सूनामीचा इशारा देण्यात आला आहे. कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment