Sunday, August 24, 2025

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून

भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मीरा- भाईंदर महानगरपालिकेने वर्ष २०१९ मध्ये ३ लाख ५५ हजार रु.खर्च करून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन खरेदी केली होती. परंतु, गेली ६ वर्षे ती एकदाही न वापरल्यामुळे भंगारामध्ये टाकण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर झाली आहे.

गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आणि कमी किंमतींत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे हा मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाचा उद्देश होता. तत्कालीन महिला व बालकल्याण समिती सभापती दीपिका अरोरा यांनी उपायुक्तांकडे लेखी पत्राद्वारे यंत्रणा खरेदी करण्याची मागणी केली होती. मशीन खरेदी करताना महापालिकेने कोणतीही स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवली नाही.

केवळ संस्कृती एंटरप्रायझेस या ठेकेदाराकडून कोटेशन घेण्यात आले होते. एका महिला स्वयंसेवी संस्थेसोबत उपक्रम राबविण्यासाठी तीन वर्षांचा करारही केला होता. परंतु, संबंधित संस्थेने काम सुरू केले नाही. त्यामुळे न वापरलेली मशीन कार्यालयात पडून राहिली, तिची देखभालही केली गेली नाही.

मशीन पूर्णतः गंजून गेली आहे, तिची मोटर आणि सर्व भाग निकामी झाले असून बंद अवस्थेत आहेत. तसेच नॅपकिन तयार करण्यासाठी खरेदी केलेला कच्चा माल विशेषतः

कापूस पूर्णतः खराब होऊन वापरण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे. शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या महितीनुसार हे प्रकरण उजेडात आले आहे. या संस्थेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची महितीसुध्दा समोर आली आहे.

या बाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती घेण्यासाठी उपायुक्त, समाज विकास अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी संबंधित विभागाला खुलासा करण्याबाबत पत्र दिले असून ती माहिती मिळाली की आपणास देण्यात येईल असे सांगण्यात आले.

Comments
Add Comment